मुंबई : सलामी लढतील विजयी ठरलेला कोलकाता नाईट रायडर्स आयपीएलमध्ये बुधवारी रॉयल चॅलेंजर्स बॅंगलोरविरुद्ध (आरसीबी) खेळणार आहे.
श्रेयस अय्यरच्या नेतृत्वात केकेआरने पहिल्या सामन्यात सीएसकेवर सहा गड्यांनी मात केली. दुसरीकडे आरसीबीने २०० वर धावा करूनही त्यांचा पंजाब किंग्सकडून पाच गड्यांनी पराभव पत्करावा लागला होता.
आरसीबीचा कर्णधार फाफ डुप्लेसिस शानदार फॉर्ममध्ये आहे. त्याने पंजाबविरुद्ध ५७ चेंडूत ८८ धावा केल्या. सलामीचा अनुज रावत मात्र चांगल्या सुरुवातीनंतरही मोठी खेळी करण्यात अपयशी ठरला. कर्णधारपदाच्या जबाबदारीतून मोकळा झालेल्या विराट कोहलीने देखील चांगल्या फॉर्मचे संकेत दिले. आरसीबीला विजय मिळवायचा झाल्यास दिनेश कार्तिकलादेखील योगदान द्यावे लागेल.
आरसीबीच्या गोलंदाजांची मात्र पंजाबच्या फलंदाजांनी धुलाई केली होती. मोहम्मद सिराजने ५९ धावा दिल्या. डेथ ओव्हरमध्ये हर्षल पटेलकडे धावा रोखण्याची जबाबदारी असेल. श्रीलंकेचा फिरकीपटू वानिंदु हसरंगाच्यापुढे गडी बाद करण्याचे आव्हान असेल.
केकेआरने पहिल्या सामन्यात सर्वच क्षेत्रात दमदार कामगिरी केली. अजिंक्य रहाणे फॉर्ममध्ये परतला. अष्टपैलू व्यंकटेश अय्यरने केवळ १६ धावा केल्या. मात्र, तो मोठी खेळी करण्यास सक्षम आहे. मधल्या फळीत श्रेयस अय्यर, सॅम बिलिंग्स आणि शेल्डन जॅक्सन यांच्यावर धावा काढण्याची जबाबदारी असेल.
गोलंदाजीत मागच्या सामन्यात उमेश यादवने चोख कामगिरी बजावली. त्याचवेळी शिवम मावी, फिरकीपटू चक्रवर्ती आणि सुनील नारायण यांच्याकडून मोठ्या अपेक्षा असतील. अष्टपैलू आंद्रे रसेल हा फलंदाजी आणि गोलंदाजीत चमकदार ठरल्यास सामन्यात मोठा फरक निर्माण होऊ शकतो.
Web Title: IPL 2022 RCB vs KKR aims to continue winning momentum
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.