Join us  

IPL 2022, RCB Vs KKR: एकाच बाजूला धावले आरसीबीचे दोन फलंदाज, तरीही झाले नाहीत बाद, असा झाला चमत्कार

IPL 2022, RCB Vs KKR: धाव घेताना गोंधळ उडून दोन फलंदाज एकाच बाजूला गेले तर तर त्यातील एक जण बाद होणे ठरलेलेच असते. मात्र काल सामना निर्णायक स्थितीत असताना बंगळुरूच्या डावात एक अजबच चित्र दिसले.

By ऑनलाइन लोकमत | Published: March 31, 2022 10:33 AM

Open in App

नवी मुंबई - आयपीएलमध्ये काल रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आणि कोलकाता नाईटरायडर्स यांच्यात झालेल्या लढतीत एक आश्चर्यकारक घटना घडली. सर्वसाधारणपणे धाव घेताना गोंधळ उडून दोन फलंदाज एकाच बाजूला गेले तर तर त्यातील एक जण बाद होणे ठरलेलेच असते. मात्र काल सामना निर्णायक स्थितीत असताना बंगळुरूच्या डावात एक अजबच चित्र दिसले. चोरटी धाव घेण्याच्या नादात बंगळुरूचे दोन फलंदाज एकाच बाजूला पोहोचले. मात्र फलंदाजांप्रमाणेच कोलकाऱ्याच्या क्षेत्ररक्षकांचाही गोंधळ उडाला आणि त्यांना फलंदाजाला धावबाद करण्यात अपयश आले. 

ही घटना धावांचा पाठलाग करण्यासाठी उतरलेल्या आरसीबीच्या डावातील १९ व्या षटकात घडली. आरसीबीच्या डावादरम्यान, व्यंकटेश अय्यर १९वं षटक टाकण्यासाठी आला. या षटकातील दुसऱ्या चेंडूवर दिनेश कार्तिकने ऑफसाईडला फटका मारून एक धाव घेण्याचा प्रयत्न केला. त्यासाठी त्याने हर्षल पटेलला कॉलही दिला. मात्र पुढच्याचवेळी चेंडू क्षेत्ररक्षकाकडे असून धाव घेणे अडचणीचे ठरेल, असे दिनेश कार्तिकला वाटले. त्यानंतर भांबावलेल्या कार्तिकने हर्षल पटेलला माघारी परतण्यास सांगितले. मात्र तोपर्यंत खूप उशीर झाला होता. तसेच दोन्ही फलंदाज एकाच बाजूला पोहोचले.

मात्र गोंधळ केवळ आरसीबीच्या फलंदाजांचाच नाही तर केकेआरच्या क्षेत्ररक्षकांचाही उडाला. ऑफसाईडला असलेल्या क्षेत्ररक्षकाने सरळ थ्रो करण्याचा प्रयत्न केला. मात्र त्याचा नेम चुकला. त्यामुळे कार्तिकला दुसऱ्या बाजूला पोहोचण्यास वेळ मिळाला. त्याने त्वरित धाव घेत एक धाव पूर्ण केली. कार्तिकचे नशीब चांगलेच जोरावर होते. त्यामुळे एकाच एंडवर दोन्ही फलंदाज उभे राहिल्यानंतरही तो बचावला.

जर क्षेत्ररक्षकाने हा थ्रो नॉन स्ट्रायकर एंडवर मारला असता तर एक फलंदाज बाद झाला असता आणि सामन्याचे चित्रही पालटले असते. कारण दिनेश कार्तिक आणि हर्षल पटेलच्या जोडीनेच अखेरीस या सामन्याचे चित्र पालटवले. कार्तिकने शेवटच्या षटकात एक षटकार आणि एक चौकार ठोकत बंगळुरूला विजय मिळवून दिला. आताा हा व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.  

टॅग्स :आयपीएल २०२२रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरकोलकाता नाईट रायडर्सदिनेश कार्तिक
Open in App