IPL 2022 T20 Match RCB vs PBKS Live Updates : पंजाब किंग्स ( Punjab Kings) विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू ( Royal Challengers Bangalore) यांच्यातल्या लढतीत डाव्या-उजव्यांचा खेळ पाहायला मिळाला. RCBच्या फॅफ ड्यू प्लेसिस, विराट कोहली, दिनेश कार्तिक यांच्या फटेकबाजीला PBKS च्या शिखर धवन व भानुका राजपक्षा या डावखुऱ्या फलंदाजांनी टक्कर दिली. ओडिन स्मिथला ( Odean Smith) जीवदान दिल्याचा फटका RCBला बसला. त्याने १८व्या षटकात २५ धावा चोपून सामना PBKSच्या पारड्यात आणून ठेवला. त्यापुढे शाहरूख खानने औपचारिकता पार पाडली आणि पंजाबने बाजी मारली.
फॅफ ड्यू प्लेसिनने ( Faf du Plessis) रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा कर्णधार म्हणून पहिल्याच सामन्यात दमदार खेळ केला. अनुज रावत, विराट कोहली व दिनेश कार्तिक यांनीही दमदार खेळी करताना पंजाब किंग्ससमोर २०६ धावांचे लक्ष्य ठेवले. युवा फलंदाज अनुज रावतला सोबत घेऊन सुरूवातीला फॅफने ५० धावा जोडून मजबूत पाया रचला. त्यानंतर विराट कोहली ( Virat Kohli) सोबत मिळून पंजाब किंग्सच्या ( PBKS) गोलंदाजांना अक्षरशः चोपून काढले. या दोघांनी दुसऱ्या विकेटसाठी ६१ चेंडूंत ११८ धावांची भागीदारी करून RCB ला मोठी धावसंख्या उभारून दिली. ७ धावांवर जीवदान मिळालेला फॅफ ५७ चेंडूंत ३ चौकार व ७ षटकारांच्यासह ८८ धावांवर माघारी परतला.
दिनेश कार्तिकने विराटसह १७ चेंडूंत नाबाद ३७ धावांची भागीदारी केली. कार्तिकने १४ चेंडूंत ३२ धावा, तर विराटने २९ चेंडूंत ४१ धावा चोपल्या. अनुज २१ धावांवर राहुल चहरच्या गोलंदाजीवर त्रिफळाचीत झाला. दिनेश कार्तिकने दमदार खेळ करताना विराटसह RCB ला २ बाद २०५ धावांचा डोंगर उभा करून दिला. प्रत्युत्तरात पंजाब किंग्सकडूनही जबरदस्त पलटवार झाला. शिखर धवन व मयांक अग्रवाल या जोडीने पहिल्या विकेटसाठी १० च्या सरासरीने ७१ धावांची भागीदारी केली. वनिंदू हसरंगाने त्याच्या पहिल्याच षटकात ही जोडी तोडली. मयांक २४ चेंडूंत २ चौकार व २ षटकारांसह ३२ धावांवर बाद झाला.