IPL 2022 Royal Challengers Bangalore vs Punjab Kings Live Updates : पंजाब किंग्सने ( Punjab Kings) आयपीएल २०२२च्या आजच्या लढतीत रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूला ( RCB) चारी मुंड्या चीत केले... जॉनी बेअरस्टो व लिएम लिव्हिंगस्टोनच्या फटकेबाजीच्या जोरावर पंजाबने २०९ धावांचा डोंगर उभा केला. तो सर करताना RCBच्या स्टार फलंदाजांची दमछाक झाली. विराट कोहलीने पुन्हा अपयशाचा पाढा गिरवला... पंजाबच्या गोलंदाजांनी टिच्चून मारा करताना बंगळुरूच्या फलंदाजांना जाळ्यात अडकवले आणि क्षेत्ररक्षकांनी सुरेख झेल टिपून त्यांना योग्य साथ दिली. पंजाबने हा विजय मिळवून स्वतःला प्ले ऑफच्या शर्यतीत कायम राखलेय खरे, परंतु त्यांचे गणित हे अजूनही नेट रन रेटवर अवलंबून असणार आहे.
पंजाब किंग्सच्या २०९ धावांचा पाठलाग करताना रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूच्या चाहत्यांना विराट कोहली व फॅफ ड्यू प्लेसिसकडून फार अपेक्षा होती. पण, कागिसो रबाडा व रिषी धवन यांनी RCBच्या दोन्ही सलामीवीरांना माघारी पाठवून मोठा धक्का दिला. या सामन्याआधी विराट कोहलीच्या नावावर २१९ सामन्यांत ३६.३१च्या सरासरीने ६४९९ धावा केल्या होत्या आणि पहिली धाव घेताच आयपीएलमध्ये ६५०० धावा करणारा तो पहिलाच फलंदाज ठरला. तसेच ट्वेंटी-२०त १०५०० धावा करणारा पहिला भारतीय फलंदाजही तोच ठरला. कागिसो रबाडाने चौथ्या षटकात RCBला मोठा धक्का दिला. सुरेख फटका मारणाऱ्या विराटला त्याने बाद केले. २० धावांवर माघारी परतताना विराटही देवाकडे जाब विचारताना दिसला. पुढील षटकात रिषी धवनने फॅफला ( १०) व महिपाल लोमरोर ( ६) यांना बाद करून PBKSला मोठे यश मिळवून दिले.
ग्लेन मॅक्सवेल व रजत पाटिदार यांनी दमदार कामगिरी करून RCBचा संघर्ष सुरू ठेवला होता. या दोघांनी ३७ चेंडूंत ६४ धावांची भागीदारी केली. मॅक्सवेलची फटकेबाजी पाहून पंजाबचा राहुल चहर चिडला आणि त्याच्याकडे पाहून काहीतरी पुटपूटला. ११व्या षटकात राहुलने ही भागीदारी संपुष्टात आणताना रजतला २६ धावांवर माघारी जाण्यास भाग पाडले. पुढच्याच षटकात हरप्रीत ब्रारने मोठी विकेट घेतली. मॅक्सवेल २२ चेंडूंत ३५ धावांवर बाद झाला. RCB चा निम्मा संघ १०५ धावांवर माघारी परतला होता आणि आता सर्व मदार दिनेश कार्तिकवरच होती. पण, अर्षदीप सिंगने RCB ला धक्का देताना कार्तिकला ( ११) बाद केले आणि पंजाबचा विजय पक्का झाला. रिषी धवन ( २-३६), राहुल चहर ( २-३७) यांनी प्रत्येकी दोन विकेट्स गेतल्या. कागिसो रबाडाने ( ३-२१) महत्त्वाच्या विकेट्स घेतल्या. हरप्रीत ब्रार व अर्षदीपच्या नावावर एक विकेट राहिली. बंगळुरूला ९ बाद १५५ धावा करता आल्या आणि पंजाबने ५४ धावांनी सामना जिंकला.
जॉनी बेअरस्टो व शिखर धवन ( २१) यांनी पहिल्या विकेटसाठी ६० धावांची भागीदारी केली. बेअरस्टो २९ चेंडूंत ४ चौकार व ७ षटकारांसह ६६ धावांवर माघारी परतला. लिएम लिव्हिंगस्टोन फटकेबाजीच्या मूडमध्ये दिसला आणि त्यामुळे कर्णधार मयांक अग्रवाल सावध खेळ करत होता. अग्रवालसह त्याने ५१ धावांची भागिदारी केली. अग्रवाल ( १९) धावांवर बाद झाला. लिव्हिंगस्टोनने ४२ चेंडूंत ५ चौकार व ४ षटकारांसह ७० धावा चोपल्या. पंजाबने ९ बाद २०९ धावा कुटल्या. हर्षल पटेलने ३४ धावांत ४ विकेट्स घेतल्या. वनिंदू हसरंगाने १५ धावांत २ विकेट्स घेत चांगली गोलंदाजी केली. ग्लेन मॅक्सवेल व शाहबाद अहमद यांना प्रत्येकी १ विकेट मिळाली. ( पाहा IPL 2022 - RCB vs PBKS सामन्याचे लाईव्ह स्कोअरकार्ड )