IPL 2022 ROYAL CHALLENGERS BANGALORE vs SUNRISERS HYDERABAD Live Updates : सनरायझर्स हैदराबादने इंडियन प्रीमिअर लीग २०२२च्या आजच्या सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूवर एकतर्फी विजय मिळवला. मार्को येनसेनने ( Marco Jansen) दुसऱ्याच षटकात तीन मोठे धक्के देत RCBचे कंबरडे मोडले. त्यानंतर RCBला डोके वर काढताच आले नाही. टी नटराजन व जगदीसा सुचिथ यांनीही दमदार गोलंदाजी करून RCBचा डाव ६८ धावांत गुंडाळला. आयपीएल इतिहासातील ही चौथी निचांक कामगिरी ठरली. विराट कोहलीच्या ( Virat Kohli) मागे लागलेला भोपळा याही सामन्यात कायम राहिला. SRH ने हे माफक लक्ष्य सहज पार केले.
मार्को येनसनने दुसऱ्याच षटकात RCBचे ढाबे दणाणून सोडले. त्याने दुसऱ्या चेंडूवर RCBचा कर्णधार फॅफ ड्यू प्लेसिसचा ( ५) त्रिफळा उडवला, त्यानंतर विराटला (०) दुसऱ्या स्लिपमध्ये कॅच देण्यास भाग पाडले. ६व्या चेंडूवर अनुज रावत ( ०) माघारी परतला. ग्लेन मॅक्सवेल आला आणि फटकेबाजी केली, परंतु टी नटराजनने पाचव्या षटकात त्याची विकेट घेतली. सुयश प्रभुदेसाई ( १५) संघर्ष करताना दिसला, परंतु ९व्या षटकात जगदीशाने त्याला माघारी पाठवले. त्याच षटकात जगदीशाने RCBचा स्टार दिनेश कार्तिकला भोपळ्यावर बाद केले. शाहबाद अहमद ( ७) व हर्षल पटेल ( ४) यांना अनुक्रमे उम्रान मलिक व टी नटराजनने बाद केल्याने RCBची अवस्था ८ बाद ५५ अशी झाली. टी नटराजन व भुवनेश्वर कुमारने अखेरच्या दोन विकेट्स घेतल्या आणि RCBचा संघ ६८ धावांत माघारी पाठवला. मार्को येनसेन व टी नटराजन यांनी प्रत्येकी ३, सुचिथने दोन विकेट्स घेतल्या.
केन विलियम्सन व अभिषेक शर्मा यांनी सहज विजय मिळवून दिला. अभिषेक २८ चेंडूंत ८ चौकार व १ षटकाराच्या मदतीने ४७ धावांवर बाद झाला. त्याने केनसह पहिल्या विकेटसाठी ६४ धावा जोडल्या. राहुल त्रिपाठीने षटकार खेचून हैदराबादचा विजय पक्का केला. हैदराबादने ८ षटकांत १ बाद ७२ धावा करून विजय मिळवला. त्यांनी ९ विकेट्स व ७२ चेंडू राखून हा विजय मिळवला. हैदराबादचा हा सलग पाचवा विजय ठरला आणि त्यांनी गुणतालिकेत थेट दुसऱ्या स्थानी झेप घेतली.
Web Title: IPL 2022 RCB vs SRH Live Updates : Sunrisers Hyderabad chase down 69 runs from just 8 overs against Royal Challengers Bangalore
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.