आयपीएलमध्ये सामने जिंकण्याच्या क्षमतेमुळे फ्रॅन्चायजी संघ खेळाडूंना ‘रिटेन’ करतात. यंदा काही अपवाद वगळता आठ फ्रॅन्चायजींनी रिटेन केलेल्या बहुतेक खेळाडूंनी अपेक्षाभंग केला. रिटेन करण्यात आलेल्या खेळाडूंच्या कामगिरीवर नजर टाकू या...
मुंबई इंडियन्स : सूर्यकुमार आणि जसप्रीत बुमराह हे त्यांच्या ‘स्टारडम’वर टिकून आहेत. रोहित आणि पोलार्डच्या खराब कामगिरीचा मात्र संघाला चांगलाच फटका बसला. या दोन्ही दिग्गजांनी पाच जेतेपदात प्रमुख भूमिका बजावली होती. यंदा दोघांची कामगिरी ढेपाळल्याने संघ दहाव्या स्थानावर घसरला आहे.
सीएसके : रिटेन केलेल्या चारपैकी मोईन आणि धोनी यांनीच सरस खेळ केला. सुरुवातीचे अनेक सामने गमावल्यानंतर ऋतुराज अपेक्षेप्रमाणे चमकला. अर्थात, सर्वांत मोठी निराशा झाली ती रवींद्र जडेजाकडून. अष्टपैलू म्हणून संघाला त्याचा लाभ होऊ शकला नाही. शिवाय लीगच्या मध्येच राजीनामा दिल्याचादेखील काहीच लाभ झाला नाही.
केकेआर : ‘बिगहिटर’ असलेला अष्टपैलू आंद्रे रसेल याने मिळालेल्या रकमेची चांगली परतफेड केली. सुनील नारायण मात्र दहा सामन्यात केवळ सात गडी बाद करू शकला. शिवाय त्याची बॅटदेखील शांत आहे. केकेआरच्या आधीच्या यशात नारायणचा मोठा वाटा राहिला. व्यंकटेश अय्यर आणि वरुण चक्रवर्ती यांनी घोर निराश केल्यामुळे संघाचे डावपेच फसलेले जाणवत आहेत.
आरसीबी : धडाकेबाज विराट कोहली ‘बॅडपॅच’मधून जात आहे. लीग सुरू झाल्यापासून कोहलीच्या ढिसाळ फलंदाजीने त्याच्या भविष्याबाबत अनेक प्रश्न निर्माण केले. मोहम्मद सिराजची कामगिरी फारच साधारण तर मॅक्सवेलची कामगिरी माफक राहिली. आरसीबी प्ले ऑफमध्ये कायम राहिल्यास त्याचे श्रेय जोश हेझलवूड, दिनेश कार्तिक आणि वानिंदु हसरंगा यांना जाईल, मोठ्या रकमेत खरेदी केलेल्या खेळाडूंना नाही.
पंजाब किंग्स : अर्शदीपसिंगने डेथ ओव्हर्समध्ये अप्रतिम कामगिरी केली. त्याचवेळी कर्णधार मयंक अग्रवालने सलामीला प्रभावी सुरुवात केली, पण तो फॉर्म टिकवून ठेवू शकला नाही. यामुळे पंजाबची प्रगती खुंटली.
सनरायझर्स हैदराबाद : एसआरएचने तिघांना रिटेन केले. केन विल्यमसन आणि जम्मू-काश्मीरचे दोन युवा अब्दुल समद आणि उमरान मलिक. तिघांपैकी, सुपरसॉनिक वेगाने गोलंदाजी करणारा उमरान जगाचे लक्ष वेधत आहे. समद राखीव बाकावर बसून आहे, कोहली आणि रोहितसारखेच विल्यमसनने निराश केले.
दिल्ली कॅपिटल्स : ऋषभ पंत, पृथ्वी शॉ, अक्षर पटेल आणि एन्रिच नोर्खिया या चार खेळाडूंना रिटेन केले. त्यातील तिघे ५० टक्के यशस्वी ठरले. शॉ धडाकेबाज फलंदाजी करतो, पण विनाकारण बाद होतो. पंतने मोठी खेळी केली नसली तरी त्याच्या कामगिरीत सातत्य जाणवते. अक्षरलाही मागच्या सत्रासारखे गडी बाद करण्यात तितके यश येताना दिसत नाही. नोर्खिया गतवर्षी चांगलाच गाजला. यंदा दुखापती आणि खराब कामगिरीमुळे प्रकाशझोतापासून दूर आहे.
राजस्थान रॉयल्स : या संघाने ज्या तिघांना रिटेन केले त्यापैकी जोस बटलर आणि संजू सॅमसन यांनी शानदार फॉर्मच्या बळावर फ्रॅन्चायजींचा विश्वास जिंकला. आश्वासक युवा सलामीवीर यशस्वी जैस्वाल मात्र आश्चर्यकारकरीत्या अपयशी ठरला आहे, तो अंतिम एकादशमध्येही स्थान टिकवू शकला नाही.