IPL 2022 Retention : आयपीएल २०२२साठी ८ फ्रँचायझींना त्यांच्या ताफ्यातील चार खेळाडूंना कायम राखण्याची मुदत आज दुपारी १२ वाजता संपणार आहे. आयपीएलच्या पुढील पर्वात दोन नवीन संघ दाखल होणार असल्यामुळे मेगा ऑक्शन होणार आहे आणि त्यासाठी सध्या असलेल्या ८ फ्रँचायझींना प्रत्येकी ४ खेळाडूंनाच संघात कायम राखता येणार आहे. फ्रँचायझींनी त्यांची यादी बीसीसीआयकडे सुपूर्द केल्यानंतर अहमदाबाद व लखनौ फ्रँचायझींना रिलिज केलेल्या खेळाडूंमधून प्रत्येकी ३ जणांना Mega Auction पूर्वी करारबद्ध करता येणार आहे. त्यासाठी त्यांना १ ते २५ डिसेंबर ही मुदत दिली आहे. पण, या मुदतीआधीच लखनौ फ्रँचायझीनं लोकेश राहुल व राशिद खान यांच्याशी बोलणी सुरू केली. त्यामुळे पंजाब किंग्स ( PBKS) व सनरायझर्स हैदराबादनं ( SRH) या फ्रँचायझीविरोधात बीसीसीआयकडे तक्रार केली आहे.
बीसीसीआयच्या अधिकाऱ्यानं या वृत्ताला दुजोरा देताना पंजाब व हैदराबाद फ्रँचायझीनं लेखी तक्रार केली नाही, परंतु त्यांना आम्हाला लखनौ फ्रँचायझीबद्दल कळवले आहे. जर या तक्रारीत तथ्य आढळल्यास कारवाई केली जाईल, असेही त्यांनी स्पष्ट केले. ''आमच्याकडे लेखी तक्रार आलेली नाही, परंतु दोन फ्रँचाझींनी लखनौ संघाविरोधात तक्रार केली आहे. आम्ही या प्रकरणाचा तपास करत आहोत आणि तसं काही घडलं असेल तर कारवाई केली जाईल,''असे बीसीसीआय अधिकाऱ्यानं स्पष्ट केलं. ते पुढे म्हणाले,''आम्हाला संतुलन बिघडवायचे नाही. कट्टर स्पर्धा असताना तुम्ही अशा गोष्टी टाळू शकत नाहीत, परंतु सध्या खेळत असलेला संघ संघाचे संतुलन बनवण्याचा प्रयत्न करत असताना असे करणे चुकीचे आहे.'' SRH कर्णधार केन विलियम्सन व अफगाणिस्तानचा फिरकीपटू राशिद खान याला कायम राखण्यास उत्सुक आहेत. पण, राशिद खाननं फ्रँचायझीची डोकेदुखी वाढवली आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार SRH व्यवस्थापन सातत्यानं राशिद खानशी चर्चा करत आहे, परंतु राशिद त्यांचा प्रस्ताव स्वीकारू इच्छित नाही. SRHकडून मिळणाऱ्या पगारावर नाखूश आहे. आयपीएल २०२१पर्यंत राशिदला फ्रँचायझीकडून ९ कोटी वार्षिक पगार मिळत होता आणि आता त्याला त्यापेक्षा अधिक पगार हवी आहे. SRHत्याला १२ कोटी पर्यंत देण्यास तयार आहेत, परंतु राशिदला यापेक्षा अधिक पगार हवा आहे.
SRHच्या रिटेन लिस्टमध्ये केन विलियम्सन हा टॉपवर आहे आणि त्याला १६ कोटी देण्यास फ्रँचायझी तयार आहे. पण, राशिदच्या मागणीमुळे केनला दुसऱ्या क्रमांकासाठीच्या खेळाडूसाठी असलेल्या १२ कोटींवर समाधान मानावे लागेल. दुसरीकडे लोकेश राहुलनंपंजाब किंग्सकडून खेळण्यास नकार दिल्याचे वृत्त आहे आणि त्यात लखनौकडून २० कोटींची ऑफर मिळाल्याचेही कळतेय.