IPL 2022 Retention: इंडियन प्रीमिअर लीगच्या पुढील पर्वासाठी ( IPL 2022) आता मेगा ऑक्शन होणार आहे. पाच वेळच्या विजेत्या मुंबई इंडियन्सनं रोहित शर्मा, जसप्रीत बुमराह, किरॉन पोलार्ड आणि सूर्यकुमार यादव यांना संघात कायम राखण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे क्विंटन डी कॉक, हार्दिक व कृणाल पांड्या, राहुल चहर, ट्रेंट बोल्ट ही काही प्रमुख नावं आता मुंबई इंडियन्सच्या ताफ्यात दिसणार नाही. पण, एक नाव असं आहे की ज्याची चर्चा आतापासून सुरू झाली आहे. ते म्हणजे माजी फलंदाज सचिन तेंडुलकर ( Sachin Tendulkar) याचा मुलगा अर्जुन याचं... मागच्या लिलावात मुंबई इंडियन्सनं अखेरच्या बोलीवर अर्जुनला 20 लाखांच्या मुळ किमतीत ताफ्यात घेतलं होतं. पण, त्याला एकही सामना खेळण्याची संधी मिळाली नाही.
अर्जुननं मुंबईच्या सीनिअर संघात सय्यद मुश्ताक अली ट्रॉफी ट्वेंटी-20 लीगमधून पदार्पण केलं होतं. त्यात त्यानं दोन सामन्यांत दोन विकेट्स घेतल्या. मुंबईच्या सीनियर संघाकडून पदार्पण करताच अर्जुन आयपीएल ऑक्शनसाठी पात्र ठरला होता. जुलै-ऑगस्ट २०१९नंतर २१ वर्षीय अर्जुन प्रथमच स्पर्धात्मक क्रिकेट खेळायला उतरला. यापूर्वी त्यानं २०१८मध्ये श्रीलंकेविरुद्धच्या चार दिवशीय दोन सामन्यांत १९ वर्षांखालील टीम इंडियाचे प्रतिनिधित्व केलं होतं. अर्जुन यापूर्वी मुंबईच्या १९ वर्षांखालील संघाकडून खेळला होता आणि २०१७-१८च्या कूच बिहार ट्रॉफीत त्यानं १९ विकेट्स घेतल्या. त्यात त्यानं दोन सामन्यांत ५-५ विकेट्स घेतल्या होत्या.
IPL 2021च्या दुसऱ्या टप्प्यात अर्जुननं दुखापतीमुळे माघार घेतली. मुंबई इंडियन्सनं त्याला बदली खेळाडू म्हणून दिल्लीचा गोलंदाज सिमरजीत सिंगची निवड केली होती. पण, आता तर अर्जुनला रिलिज केलं गेलं आहे. तो आता पुन्हा लिलिवात उतरणार आहे आणि यावेळी त्याला मुंबई इंडियन्स पुन्हा घेतील का, याची उत्सुकता लागली आहे. यावेळेसही त्याची मुळ किंमत ही 20 लाख असणार आहे.
मुंबई इंडियन्स
रिटेन केलेले खेळाडू - रोहित शर्मा ( 16 कोटी), जसप्रीत बुमराह ( 12 कोटी), सूर्यकुमार यादव ( 8 कोटी), किरॉन पोलार्ड ( 6 कोटी)
रिलिज केलेले खेळाडू - ख्रिस लीन, अनमोलप्रीत सिंग, सौरभ तिवारी, अनुकूल रॉय, हार्दिक पांड्या, कृणाल पांड्या, जिमी निशॅम, अर्जुन तेंडुलकर, मार्को जॅनसेन, पियूष चावला, रुख कलारिया, क्विंटन डी कॉक, इशान किशन, आदित्य तरे, जयंत यादव, युधवीर सिंग, अॅडम मिल्ने, धवल कुलकर्णी, नॅथन कोल्टर नाएल, राहुल चहर, ट्रेंट बोल्ट