नवी दिल्ली : आयपीएलच्या पुढच्या मोसमात नेमके कोणते खेळाडू ठेवायचे, हा निर्णय मंगळवारी सर्व संघांना घ्यायचा होता. प्रत्येक संघाला जास्तीत जास्त चारच खेळाडू रिटेन करता येऊ शकत होते, मुंबई इंडियन्सने चार खेळाडूंना रिटेन करत सर्वांनाच धक्का दिला. मुंबई संघाने यावेळी कर्णधार रोहित शर्माला १६ कोटी रुपये मोजत आपल्या संघात कायम ठेवले.
रोहितबरोबर जसप्रीत बुमराह, सूर्यकुमार यादव आणि किरोन पोलार्ड यांना संघात कायम ठेवले बुमराहसाठी १२ कोटी रुपये मोजले. सूर्यकुमारला आठ कोटी तर पोलार्डला सहा कोटी मोजले. सीएसके संघात धोनीने आपल्यापेक्षा रवींद्र जडेजाला अधिक रक्कम द्या,अशी विनंती करीत मनाचा मोठेपणा सिद्ध केला. जडेजाला १६ कोटी मिळाले. राजस्थान रॉयल्सने मागच्या मोसमातील सर्वांत महागडा खेळाडू ख्रिस मॉरिस याला रिलिज केले. दिल्ली कॅपिटल्सने ऋषभ पंत याला देखील १६ कोटी रुपयात कायम ठेवले आहे.
धोनीच्या मनाचा मोठेपणा -धोनीने स्वत:चे मानधन कमी करून अव्वल खेळाडूचा मान रवींद्र जडेजाला दिला. त्यामुळे जडेजा १६ कोटींचा मानकरी ठरला. तर धोनीने १२ कोटींसह दुसऱ्या स्थानावर राहणे पसंत केले.
आरसीबीसाठी विराटने २ कोटींवर पाणी सोडलेविराट कोहलीला रॉयल चॅलेंजर बँगलोरने १५ कोटी रुपयांमध्ये संघात कायम राखल्याने त्याला २ कोटी रुपयांवर पाणी सोडावे लागले आहे. बीसीसीआयच्या नियमानुसार फ्रँचायझींना ४ खेळाडूंना संघात कायम राखण्यासाठी ४२ कोटींची रक्कम देण्यात आली होती. जर एखाद्या संघाने केवळ तीनच खेळाडूंना रिटेन केले तर त्यातील अव्वल खेळाडूला १५ कोटी मिळणार होते. त्यानुसार विराटला २ कोटींचा फटका बसला. मागच्या वर्षी आरसीबीने विराटला संघात कायम ठेवण्यासाठी १७ कोटींची रक्कम मोजली होती.
राहुल, राशिद अडचणीत, पंजाबची बीसीसीआयकडे तक्रार -- रिटेनशन मुदत संपण्याआधीच लोकेश राहुल आणि राशिद खान यांच्यासह लखनौ आणि अहमदाबादच्या दोन नवीन फ्रेंचायझीही अडचणीत आल्या आहेत. पंजाब किंग्ज आणि सनरायजर्स हैदराबादने राहुल आणि राशिदबाबत बीसीसीआयकडे तक्रार केली आहे. ‘नवीन फ्रेंचायझी राहुल आणि राशिद यांना त्यांच्याशी संपर्क साधून त्यांना सामील करून घेण्याचा प्रयत्न करीत आहेत. त्यामुळे त्यांच्या योजनांवर परिणाम होत असल्याची तक्रार पंजाब आणि हैदराबाद संघाने केली.
- इनसाईड स्पोर्ट्सनुसार, बीसीसीआयच्या एका अधिकाऱ्याने याची माहिती दिली. ‘आम्हाला कोणतेही पत्र मिळालेले नाही, परंतु लखनौ संघ खेळाडूंशी संपर्क करीत असल्याची तोंडी तक्रार मिळाली आहे. आम्ही त्याची चौकशी करीत असून त्यात तथ्य आढळल्यास योग्य ती कारवाई करू. संघांचा सध्याचा समतोल बिघडू नये. तीव्र स्पर्धेमध्ये हा प्रकार टाळला पाहिजे. सध्याच्या संघांनी खेळाडूंशी संपर्क साधणे योग्य नाही,’ असेही या अधिकाऱ्याने सांगितले. बीसीसीआयने तयार केलेल्या लिलावाच्या नियमानुसार, दोन्ही नवीन फ्रेंचायझींना लिलावापूर्वी त्यांच्या आवडीचे तीन खेळाडू खरेदी करण्याचा पर्याय आहे. परंतु हा पर्याय ‘ट्रेडिंग विंडो’ सुरू झाल्यानंतरच खुला होईल.
मुंबई इंडियन्स -रिटेन खेळाडू रक्कमरोहित शर्मा - १६ कोटीजसप्रीत बुमराह - १२ कोटीसूर्यकुमार यादव - ८ कोटीकिरोन पोलार्ड - ६ कोटीरिलिज खेळाडू : हार्दिक पांड्या,कृणाल पांड्या, डिकॉकशिल्लक : ४८ कोटी
रॉयल चॅलेंजर्स बॅंगलोर -विराट कोहली - १५ कोटीग्लेन मॅक्सवेल - ११ कोटीमोहम्मद सिराज - ७ कोटीरिलिज खेळाडू : हर्षल पटेल, युजवेंद्र चहल, देवदत्त पडिक्कलशिल्लक : ५७ कोटी
दिल्ली कॅपिटल्स -ऋषभ पंत - १६ कोटीपृथ्वी शॉ - ७.५ कोटीअक्षर पटेल - ०९ कोटीएन्रिच नॉर्खिया - ६.५ कोटीशिल्लक : ४७.५ कोटी
राजस्थान रॉयल्स -संजू सॅमसन - १४ कोटीजोस बटलर - १० कोटीयशस्वी जैस्वाल - ०४ कोटीशिल्लक : ६२ कोटी
पंजाब किंग्स -मयंक अग्रवाल - १४ कोटीअर्शदीपसिंग - ०४ कोटीशिल्लक: ७२ कोटी
चेन्नई सुपरकिंग्स -रवींद्र जडेजा - १६ कोटीएम.एस. धोनी - १२ कोटीमोईन अली - ०८ कोटीरुतुराज गायकवाड - ०६ कोटीशिल्लक : ४८ कोटी
कोलकाता नाईट रायडर्स -सुनील नरेन - ०६ कोटीआंद्रे रसेल - १२ काेटीवरुण चक्रवर्ती - ०८ काेटीव्यंकटेश अय्यर - ०८ काेटीशिल्लक : ४८ कोटी
सनरायझर्स हैदराबाद -केन विलियम्सन - १४ कोटीअब्दुल समद - ०४ कोटीउमरान मलिक - ०४ कोटीशिल्लक: ६८ कोटी