इंडियन प्रीमिअर लीगच्या ( IPL 2022) पुढील पर्वात लखनौ व अहमदाबाद या दोन नवीन फ्रँचायझींचा समावेश झाल्यामुळे Mega Auction होणार आहे. त्यासाठी बीसीसीआयनं सध्या खेळत असलेल्या फ्रँचायझींना ४ खेळाडूंना कायम राखता येणार आहे. मग त्या चारपैकी ३ भारतीय की १ परदेशी, २ भारतीय कि २ परदेशी हा त्या त्या संघांचा निर्णय असेल. बीसीसीआयनं या चार खेळाडूंसाठी प्रत्येक फ्रँचायझींना एक बजेट आखून दिलं आहे आणि त्यातूनच त्यांना खेळाडू निवडावे लागतील. ८ फ्रँचायझींनी १ ते ३० नोव्हेंबर या कालावधीत त्यांच्या चार रिटेन केलेल्या खेळाडूंची नावं बीसीसीआयकडे सोपवायची आहेत आणि १ ते २५ डिसेंबर या कालावधीत लखनौ व अहमदाबाद या दोन नव्या फ्रँचायझींनी रिलीज केलेल्यांपैकी कोणत्या तीन खेळाडूंना करारबद्ध केलेय, हे स्पष्ट करायचे आहे.
जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात मेगा ऑक्शन होणार आहे. बीसीसीआयनं यावेळी प्रत्येकी फ्रँचायझीला ९० कोटींची पर्स दिली आहे आणि त्यातच त्यांना संघबांधणी करायची आहे. बीसीसीआयनं ८ फ्रँचायझींना चार खेळाडू रिटेन करण्यासाठी ४२ कोटींचा बजेट दिला आहे. ही रक्कम त्यांच्या सॅलरी पर्समधून वजा केली जाईल. समजा एखाद्या फ्रँचायझीनं चार खेळाडू रिटेन केले तर त्यांच्या पर्समधून ४२, तीन खेळाडू रिटेन केले तर ३३ कोटी, दोन खेळाडू रिटेन केल्यास २४ कोटी आणि एक खेळाडू रिटेन केल्यास १४ कोटी वजा केले जातील. अनकॅप खेळाडूला रिटेन केल्यास ४ कोटी वजा होतील.
चार खेळाडू रिटेन केल्यास पहिल्या खेळाडूसाठी १६ कोटी, दुसऱ्यासाठी १२, तिसऱ्यासाठी ८ आणि चौथ्यासाठी ६ कोटी मर्यादा घातली गेली आहे. तीन खेळाडू रिटेन केल्यास पहिल्या खेळाडूसाठी १५ कोटी, दुसऱ्या खेळाडूसाठई ११ व तिसऱ्या खेळाडूसाठी ७ कोटी अशी मर्यादा असेल. दोन खेळाडू रिटेन केल्यास १४ व १० अशी अनुक्रमे पहिल्या व दुसऱ्या खेळाडूसाठी मर्यादा असेल. एकच खेळाडू रिटेन केल्यास तो १४ कोटींच्या आतच करावा लागेल.
असे असतील नवे नियम ( IPL 2022 New Rules and Format)
- २०११मध्ये १० संघ खेळले होते आणि तोच फॉरमॅट २०२२मध्येही असेल.
- दहा संघांनी दोन प्रत्येकी पाच-पाच अशा दोन गटांत विभागणी करण्यात येईल
- गटातील प्रत्येक संघ एकमेकांशी दोन आणि दुसऱ्या गटातील संघाशी एक असे सामने खेळतील
- साखळी फेरीत प्रत्येक संघ १४ सामने खेळतील. विजयी संघाला दोन गुण मिळतील, तर सामना अनिर्णीत राहिल्या दोन्ही संघांना प्रत्येकी १-१गुण दिला जाईल.
प्ले ऑफचे चार सामने
- क्वालिफायर १ - साखळी फेरीत पहिल्या व दुसऱ्या क्रमांकावर असलेल्या संघांमध्ये
- एलिमिनेटर - तिसऱ्या व चौथ्या क्रमांकावर असलेल्या संघांमध्ये
- क्लालिफायर २ - क्वालिफायर १मधील पराभूत संघ विरुद्ध एलिमिनेटर मधील विजयी संघ
- अंतिम सामना - क्वालिफायर १ विरुद्ध क्वालिफायर २