नवी दिल्ली : कोलकाता नाईट रायडर्सचा २४ वर्षांचा डावखुरा फलंदाज रिंकूसिंग. मूळचा अलिगडचा. २०१८ पासून आयपीएलमध्ये आहे. राईट आर्म ऑफब्रेक गोलंदाजीही करतो. सोमवारी राजस्थानविरुद्ध २३ चेंडूंत नाबाद ४२ धावा फटकावून सामनावीर ठरला. रिंकूची क्रिकेटमधील वाटचाल अतिशय काटेरी ठरली.
आर्थिक संघर्षामुळे त्याला दहावीआधीच शिक्षण सोडावे लागले. वडील खानचंद्रसिंग हे खासगी सिलिंडर एजन्सीस कर्मचारी. पाठीवरून घरोघरी सिलिंडर पोहोचवायचे. पाच भाऊ-बहिणींमध्ये रिंकू तिसऱ्या नंबरचा. घरची परिस्थिती चांगली नसल्याने त्याने सफाई कर्मचारी म्हणून काम केले. या काळात क्रिकेटवर त्याचे जीवापाड प्रेम होते. सफाई कामगार म्हणून वेळ दिल्यानंतरचा वेळ खेळासाठीच असायचा. त्याचे श्रम फळाला आले. यशस्वी क्रिकेटपटू बनण्याच्या मार्गात त्याला पुढील शिक्षण मात्र घेता आले नाही.
रिंकूला २०१७ च्या लिलावात पंजाब किंग्सने दहा लाख रुपयांत घेतले होते. खेळण्याची संधी मात्र केकेआरने २०१८ ला दिली. चार सामने तो खेळू शकला. २०१९ च्या पर्वात पाच, तर २०२० ला केवळ एकच सामना खेळता आला. २०२१ ला जखमी असल्याने तो लीगमधून बाहेर होता. यंदा मेगा लिलावात केकेआरने रिंकूला ५५ लाख दिले. आतापर्यंत तीन सामन्यांत त्याने शंभर धावा केल्या. रिंकू-नितीश राणा यांनी काल नाबाद ६६ धावा ठोकून केकेआरला सलग पाच पराभवानंतर विजयपथावर आणले.
राजस्थानविरुद्ध रिंकूने महत्त्वपूर्ण खेळी केली. सामना संपताच आपल्या वक्तव्याने सर्वांना आश्चर्याचा धक्काही दिला. ‘सामना सुरू होण्यापूर्वीच आपण किती धावा काढू आणि सामनावीर पुरस्कारही आपल्यालाच मिळणार,’ हे तळहातावर लिहून ठेवल्याचा त्याने खुलासा केला. नितीश राणा आणि रिंकू यांच्यातील संभाषणाचा व्हिडिओ केकेआरने ट्विटर हँडलवर शेअर केला. त्यात नितीश राणा तू हातावर काय लिहिले आहे? असे विचारतो. त्यावर रिंकू सिंगने उत्तर दिले आहे, ‘मला वाटले होते की आज धावा करून सामनावीर ठरेन आणि मी माझ्या हातावर ५० धावा लिहिल्या आहेत,’ असे रिंकूने म्हटले.
त्यावर राणाने तू हे कधी लिहिले? असे विचारले. यावर रिंकू सिंगने आजच्या सामन्यापूर्वी लिहिले असल्याचे म्हटले. पुन्हा नितीश राणाने रिंकूला ‘तुला कसे कळले की तू आज एवढ्या धावा करशील?’ असा प्रश्न विचारला. यावर ‘प्लेअर ऑफ मॅच मिळण्यासाठी मी खूप दिवसांपासून प्रतीक्षा करीत होतो. पाच वर्षांनी ती संधी आली; पण शेवटी,’ असे रिंकूने म्हटले.
Web Title: ipl 2022 rinku singh who nearly became a sweeper star in kkr win vs rajasthan shah rukh khan team
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.