आयपीएलमध्ये राजस्थान रॉयल्स संघ उत्तम कामगिरी करत आहे. संघ सध्या गुणतालिकेत दुसऱ्या क्रमांकावर आहे. पण संघाप्रमाणेच रियान परागचंही चर्चेचा विषय ठरत आहे. त्याच्या फलंदाजीमुळे नव्हे, तर त्याच्या वागणुकीमुळे. होय, रियान परागच्या मैदानातील हरकती सध्या चर्चेचा विषय ठरत आहेत. लखनौ सुपरजाएंट्स विरुद्धच्या सामन्यात रियान परागनं केलेल्या अशाच एका कृतीचं सोशल मीडियात तुफान ट्रोल केलं जात आहे.
लखनौ विरुद्धच्या सामन्यातील अखेरच्या षटकात रियान परागनं जे केलं ते अनेकांना पसंत पडलेलं दिसत नाही. क्रिकेटचे चाहते आणि समालोचक देखील रियानवर टीका करत आहेत. सोशल मीडियापासून मैदानापर्यंत सर्वच जण रियानला सुनावत आहेत.
लखनौ विरुद्धच्या सामन्यात २० वं षटक राजस्थानचा गोलंदाज प्रसिद्ध कृष्णा करत होता. षटकाच्या दुसऱ्या चेंडूवर रियान परागनं झेल टिपल्यानंतर जी कृती केली त्यावर नाराजी व्यक्त केली जात आहे. प्रसिद्ध कृष्णानं लखनौचा अष्टपैलू मार्कस स्टॉयनिस याला चेंडू टाकला. स्टॉयनिसनं उंच फटका लगावला. रियान परागनं अचूक झेल टिपत त्याला बाद केलं. पण झेल टिपल्यानंतर रियान परागनं चेंडू जमिनीला स्पर्श करण्याचा ड्राम करत सेलिब्रेशन केलं. हेच सेलिब्रेशन अनेकांना रुचलेलं दिसत नाही.
सोशल मीडियात रियानच्या याच कृतीचा निषेध व्यक्त केला जात आहे. एक खेळाडू म्हणून अशी कृती करणं योग्य नसून खिलाडूवृत्तीनं प्रत्येकानं खेळलं पाहिजे अशी भावना व्यक्त केली जात आहे. तर काहींनी रियान परागनं केलेली कृती खिलाडूवृत्ती नसल्याचं म्हटलं आहे. काहींनी तर रियानला मूर्ख ठरवलं असून आयपीएलमध्ये त्याच्यावर बंदीची देखील मागणी केली आहे.
ऑस्ट्रेलियन अन् वेस्ट इंडिजवालेही भडकले
रियान परागच्या कृतीनं क्रिकेट चाहते तर संतापलेच पण सामन्यात समालोचन करणाऱ्या अनेक दिग्गजांनाही ते पसंत पडलं नाही. ऑस्ट्रेलियाचे माजी क्रिकेटपटू मॅथ्यू हेडन यांनी या युवा खेळाडूला सल्ला दिला. ते म्हणाले, क्रिकेट खूप दीर्घकालीन खेळ आहे आणि प्रत्येकाच्या आठवणी या खेळाशी जोडलेल्या आहेत. नशिबाला कधीच आव्हान देऊ नये. नाहीतर नशिबानं पलटवार केला तर सारं उलटं होऊन बसतं". तर वेस्ट इंडिजचे माजी क्रिकेटपटू इयान बिशप यांनी भविष्यात याची परतफेड होईल असं म्हणत रियानच्या कृतीवर नाराजी व्यक्त केली.
Web Title: ipl 2022 riyan parags theatrics after marcus stoinis catch not impress commentators or the fans
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.