IPL 2022 Rajasthan Royals vs Royals Challengers Banglore : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूच्या गोलंदाजांनी आज उल्लेखनीय कामगिरी केली. मोहम्मद सिराज ( २-३०), जॉश हेजलवूड ( २-१९) व वनिंदू हसरंगा ( २-२३) यांनी राजस्थान रॉयल्सला सुरुवातीला धक्के दिले. पण, रियान परागने ( Riyan Parag) संयमी खेळी करताना अर्धशतकासह RRला समाधानकारक पल्ला गाठून दिला. मात्र, २०व्या षटकाच्या अखेरच्या चेंडूवर परागचा संयम सुटला अन् RCB चा गोलंदाज हर्षल पटेल ( Riyan Parag vs Harshal Patel) याच्यासोबत त्याचा वाद झाला.
ऑरेंज कॅपच्या शर्यतीत आघाडीवर असलेला जोस बटलर ( ७) आज अपयशी ठरला. देवदत्त पडिक्कलने (८) अपयशाचा पाढा कायम राखला. तिसऱ्या क्रमांकावर बढती मिळालेल्या आर अश्विनने ( १७) चार चौकार खेचून चांगले संकेत दिले, परंतु मोहम्मद सिराजने त्याला माघारी पाठवला. कर्णधार संजू सॅमसनकडून ( २७) अपेक्षा होत्या, परंतु वनिंदूने चतुराईने त्याला बाद केले. वनिंदूच्या चेंडूवर रिव्हर्स स्वीप मारण्याचा संजूचा प्रयत्न फसला आणि वेगाने टाकलेल्या चेंडूने त्रिफळा उडवला. मिचेल ( १६) व रियान पराग यांनी ३१ धावांची भागीदारी केली. शिमरोन हेटमायर ( ३) पुन्हा फेल गेला.
रियान परागने एकाकी झूंज देताना २९ चेंडूंत अर्धशतक पूर्ण केले. परागने ३१ चेंडूंत ३ चौकार व ४ षटकारांसह नाबाद ५६ धावा केल्या. राजस्थानने ८ बाद १४४ धावा केल्या. त्याने हर्षल पटेलने टाकलेल्या २०व्या षटकात १८ धावा चोपल्या. अखेरच्या चेंडूवर खणखणीत षटकार मारून पेव्हेलियनच्या दिशेने जाणाऱ्या रियानकडे पाहून हर्षल काही बडबडला. त्यानंतर रियान जाब विचारण्यासाठी माघारी फिरला. दोघांमध्ये वाद वाढणार लक्षात येताच RRच्या सपोर्ट स्टाफमधील सदस्याने हर्षलला रोखले.