IPL 2022 Rajasthan Royals vs Royals Challengers Banglore : राजस्थान रॉयल्सची आघाडीची फळी आज रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूसमोर कोलमडली. फॉर्मात असलेला जोस बटलर ( Jos Buttler) आज अपयशी ठरला. मोहम्मद सिराज, जॉश हेझलवूड व वनिंदू हसरंगा यांनी उत्तम गोलंदाजी करून RRच्या धावांना लगाम लावला. आजच्या सामन्यात विराट कोहली ( Virat Kohli) च RCBचे नेतृत्व करताना दिसला. त्याने आजच्या सामन्यातही एक भन्नाट कॅच घेतला. RRकडून रियान परागने ( Riyan Parag) एकट्याने खिंड लढवली. त्याच्या अर्धशतकाच्या जोरावर राजस्थानने समाधानकारक पल्ला गाठला.
RCBने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आणि दुसऱ्याच षटकात मोहम्मद सिराजने त्यांना यश मिळवून दिले. RRचा सलामीवीर देवदत्त पडिक्कल ( ७) LBW झाला. राजस्थानने तिसऱ्या क्रमांकावर आर अश्विनला ( R Ashwin) फलंदाजीला पाठवून सर्वांना आश्चर्याचा धक्का दिला. अश्विननेही पहिल्या दोन चेंडूंवर चौकार खेचून RCBला थक्क केले. त्यानंतरच्या सिराजच्या षटकातही अश्विनने सलग दोन चौकार खेचले, परंतु RCBच्या गोलंदाजाने संथ बाऊन्सर टाकून अश्विनला ( १७) माघारी पाठवले. पुढील षटकात जॉश हेझलवूडने RRला मोठा धक्का देताना बटलर ( ८) याची विकेट घेतली.
संजू व डॅरील मिचेल यांनी RRचा डाव सावरण्याचा प्रयत्न केला. संजूने तीन खणखणीत षटकार खेचून RCBच्या ताफ्यात तणाव निर्माण केले होते, परंतु वनिंदूने चतुराईने त्याला बाद केले. वनिंदूच्या चेंडूवर रिव्हर्स स्वीप मारण्याचा संजूचा प्रयत्न फसला आणि वेगाने टाकलेल्या चेंडूने त्रिफळा उडवला. संजू २७ धावांवर बाद झाला. मिचेल व रियान पराग यांनी ३१ धावांची भागीदारी केली, परंतु १५व्या षटकात फटका मारण्याच्या प्रयत्नात मिचेल ( १६) बाद झाला. शिमरोन हेटमायरचा ( ३) अपयशाचा पाढा आजही कायम राहिला. वनिंदूने २३ धावा देत २ विकेट्स घेतल्या. १८व्या षटकात हर्षल पटेलच्या गोलंदाजीवर ट्रेंट बोल्टने शॉर्ट मिडविकेटच्या दिशेने खेचलेला चेंडू विराटने अप्रतिमरित्या टिपला.