Mumbai Indians IPL 2022 squad : इंडियन प्रीमिअर लीगच्या १५व्या पर्वात सलग ८ पराभवानंतर पहिल्या विजयाची चव चाखून आनंदीत असलेल्या मुंबई इंडियन्सला गुरुवारी एक धक्का बसला. गोलंदाजांच्या निराशाजनक कामगिरीमुळे आधीच चिंतीत असलेल्या मुंबईला आता खूप मोठा धक्का बसला आहे. गोलंदाजाची बाजू भक्कम करण्यासाठी मुंबईने जुना सहकारी धवल कुलकर्णी याला ताफ्यात दाखल करून घेतले असताना संघात असलेल्या जलदगती गोलंदाजाने दुखापतीमुळे माघार घेतली आहे. इंग्लंडचा गोलंदाज टायमल मिल्स ( Tymal Mills) याने दुखापतीमुळे आयपीएलमधून माघार घेतली आणि त्याच्या जागी दक्षिण आफ्रिकेचा युवा फलंदाज त्रिस्ताना स्तुब्स ( Tristana Stubbs) याला करारबद्ध करण्यात आले आहे.
मिल्सने यंदाच्या पर्वात ५ सामन्यांत ६ विकेट्स घेतल्या होत्या. आयपीएलमध्ये एकूण त्याच्या नावावर १० सामन्यांत ११ विकेट्स आहेत. त्याच्याजागी २१ वर्षीय त्रिस्तानाला MI ने करारबद्ध केले आहे. मधल्या फळीतील २१ वर्षीय फलंदाजाने नुकतेच दक्षिण आफ्रिकन A संघातून झिम्बाब्वेविरुद्ध पदार्पण केले. स्थानिक क्रिकेटमध्येही त्याने दमदार कामगिरी केली आहे. त्याने १७ ट्वेंटी-२० सामन्यांत ३८.९२च्या सरासरीने ५०६ धावा केल्या आहेत.
मुंबई इंडियन्सने नुकतेच मध्य प्रदेशाचा डावखुरा गोलंदाज कुमार कार्तिकेय सिंग याला ( Kumar Kartikeya Singh ) आपल्या ताफ्यात दाखल करून घेतले होते. मुंबईचा गोलंदाज मोहम्मद अर्षद खान ( Md. Arshad Khan ) याला दुखापतीमुळे आयपीएल २०२२मधून माघार घ्यावी लागली आहे. त्याच्याजागी मुंबईने कुमार सिंगला करारबद्ध केले. कुमार कार्तिकेय सिंग हा मुंबई इंडियन्सच्या सपोर्ट टीमचा सदस्य आहे आणि त्याला आता करारबद्ध करण्यात आले आणि त्याने पदार्पणात चांगली कामगिरी करून दाखवली.
Web Title: IPL 2022 squad : South African Tristan Stubbs replaces injured Tymal Mills in Mumbai Indians for IPL 2022
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.