IPL 2022, Sunrisers Hyderabad vs Delhi Capitals Live Updates : इंडियन प्रीमिअर लीगच्या १५व्या पर्वात आज दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध सनरायझर्स हैदराबाद ( DC vs SRH) हा सामना रंगतोय... प्ले ऑफच्या शर्यतीत कायम राहण्यासाठी दोन्ही संघ प्रयत्नशील आहेत, परंतु हैदराबादचे पारडे किंचितसे जड आहे. त्यामुळे दिल्लीला आणखी जोर लावून हा सामना जिंकावा लागणार आहे. या सामन्याच्या निमित्ताने डेव्हिड वॉर्नर ( David Warner) विरुद्ध SRH असा सामनाही रंगणार आहे. ८ वर्षांनंतर वॉर्नर प्रथमच हैदराबादविरुद्ध खेळणार आहे. वॉर्नरने अर्धशतक झळकावून हैदराबादला सडेतोड उत्तर दिले. त्याला रिषभ पंतची ( Rishabh Pant) साथ मिळाली, परंतु रिषभ विचित्र पद्धतीने बाद झाला.
वॉर्नरला रोखण्यासाठी हैदराबादने आज संघात तीन बदल केले आहेत. सीन अॅबोट, श्रेयस गोपाळ आणि कार्तिक त्यागी हे आज हैदराबादकडून पदार्पण करत आहेत. मार्को येनसेन, टी नटराजन व वॉशिंग्टन सुंदर आज खेळत नाहीत. पृथ्वी शॉ ( Prithvi Shaw) आजच्या सामन्यात खेळणार नाही. दिल्लीच्या संघातही चार बदल झालेले आहे. पृथ्वीसह अक्षर पटेल, चेतन सकारीया व मुस्ताफिजूर रहमान यांना बसवण्यात आले आहे. त्यांच्याजागी मनदीप सिंह, खलिल अहमद, रिपाल पटेल व अॅनरिच नॉर्खिया यांना संधी मिळाली आहे. अक्षर पटेल हा दुखापतग्रस्त असल्याचे कर्णधार रिषभ पंतने सांगितले.
प्रथम गोलंदाजीला आलेल्या सनरायझर्स हैदराबादला भुवनेश्वर कुमारने चांगली सुरूवात करून दिली. भुवीने त्याच्या पहिल्या दोन षटकांत ११ चेंडू निर्धाव फेकले व १ धाव देत १ विकेट घेतली. सीन अॅबोटनेही चांगली गोलंदाजी केली अन् त्याच्या पहिल्याच षटकात वॉर्नरची कॅच सोडली. उम्रान मलिक व वॉर्नर यांच्यातला सामना पाहण्यासाठी सारेच उत्सुक होते. वॉर्नरने त्याच्या पहिल्याच षटकात २१ धावा चोपल्या. वॉर्नर व मिचेल मार्श यांनी दिल्लीचा डाव सावरला, परंतु पाचव्या षटकात अॅबोटने थोडासा संथ चेंडू टाकून मार्शला ( १०) झेल देण्यास भाग पाडले. त्याच षटकात रिषभ पंतच्या चुकीच्या कॉलने वॉर्नर रन आऊट होता होता वाचला. रिषभ व वॉर्नर यांनी २९ चेंडूंत ४८ धावांची भागीदारी करून दिल्लीची गाडी रुळावर आणली.
श्रेयस गोपाळने टाकलेल्या ९व्या षटकात वॉर्नरने पहिल्या चेंडूवर एक धाव काढून रिषभला स्ट्राईक दिल्यानंतर रिषभने पुढील चार चेंडूंवर ६, ६, ६, ४ अशी बरसात केली. पहिला षटकार स्क्वेअर लेगला, दुसरा सरळ अन् तिसरा लाँग ऑफच्या दिशेने खेचला. पण, ६व्या चेंडूवर रिषभ चूकला व बॅटची कड घेत चेंडू यष्टिंवर आदळला. रिषभला १६ चेंडूंत १ चौकार व ३ षटकारांसह २६ धावांवर माघारी जावं लागलं. ( पाहा IPL 2022 - SRH vs DC सामन्याचे लाईव्ह स्कोअरकार्ड)
Web Title: IPL 2022, SRH vs DC Live Updates : 6,6,6,4 and then Shreyas Gopal becomes the first spinner to get Rishabh Pant in IPL 2022, Watch Video
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.