IPL 2022, Sunrisers Hyderabad vs Delhi Capitals Live Updates : डेव्हिड वॉर्नर ( David Warner) व रोव्हमन पॉवेल ( Rovman Powell) या जोडीनं आज सनरायझर्स हैदराबादच्या गोलंदाजांचा पालापाचोळा केला. वॉर्नरनं चौथ्या विकेटसाठी पॉवेलसह ६६ चेंडूंत १२२ धावांची नाबाद भागीदारी करताना दिल्ली कॅपिटल्सला ३ बाद २०७ धावांचा डोंगर उभा करून दिला. विशाल लक्ष्याचा पाठलाग करताना SRHची गाडी गडगडली. निकोलस पूरनने ( Nicholas Pooran) एकट्याने संघर्ष दाखवला, परंतु तो अपूरा ठरला. दिल्लीने हा सामना जिंकून प्ले ऑफच्या शर्यतीत स्वतःला कायम राखले.
मनदीप सिंग ( ०) पहिल्याच षटकात माघारी परतल्यानंतर वॉर्नर व मिचेल मार्श यांनी डाव सावरण्याचा प्रयत्न केला. भुवनेश्वर कुमारने चांगली सुरूवात करून दिली. भुवीने त्याच्या पहिल्या दोन षटकांत ११ चेंडू निर्धाव फेकले व १ धाव देत १ विकेट घेतली. सीन अॅबोटने DC ला दुसरा धक्का देताना मार्शला ( १०) माघारी पाठवले. रिषभ पंत ( २६) व वॉर्नर यांनी २९ चेंडूंत ४८ धावांची भागीदारी करून दिल्लीची गाडी रुळावर आणली. वॉर्नर व पॉवेल ही जोडी बरसली. वॉर्नर ५८ चेंडूंत १२ चौकार व ३ षटकारांसह ९२ धावांवर नाबाद राहिला. पॉवेलने ३५ चेंडूंत ३ चौकार व ६ षटकारांसह नाबाद ६७ धावा केल्या. १९वं षटक संपल्यानंतर पॉवेल ४९, तर वॉर्नर ९२ धावांवर खेळत होता. पण, शतकाचा विचार न करता वॉर्नरने स्ट्राईकवर असलेल्या पॉवेलला नैसर्गिक खेळ करण्यास सांगितला.
प्रत्युत्तरात हैदराबादची अपेक्षित सुरुवात झाली नाही. अभिषेक शर्मा ( ७) व कर्णधार केन विलियम्सन ( ४) यांना अनुक्रमे खलिल अहमद व अॅनरिच नॉर्खिया यांनी माघारी पाठवले. राहुल त्रिपाठी आज खेळेल असे वाटले होते, परंतु मिचेल मार्शने त्याला जाळ्यात अडकवले व शार्दूल ठाकूरने त्याचा झेल टिपला. राहुल ( २२) बाद झाल्याने हैदराबादची अवस्था ३ बाद ३७ अशी झाली. निकोलस पूरन व एडन मार्कराम यांनी डाव सावरताना ३१ चेंडूंत अर्धशतकी भागीदारी पूर्ण केली. खलिल अहमदने १३व्या षटकात ही भागीदारी संपुष्टात आणली. त्या षटकात निकोलस पूरनने मारलेला सरळ चेंडू खलिलच्या डाव्या खांद्यावर जोरात आदळला, तेव्हा सर्वांच्या काळाजाचा ठोका चूकला. पुढच्या चेंडूवर खलिलने मार्करामची विकेट काढली. मार्कराम २५ चेंडूंत ४ चौकार व ३ षटकारांसह ४२ धावांवर बाद झाला.
निकोलसने सामन्याची सूत्रे हाती घेताना शशांक सिंगसह १२ चेंडूंत ३७ धावा चोपल्या. शार्दूलने १५व्या षटकात शशांकची ( १०) विकेट घेतली. विकेट्स पडूनही SRHच्या धावांचा वेग हा DCच्या वेगाइतकाच होता. हैदराबादला २४ चेंडूंत ६२ धावा करायच्या होत्या. सीन अॅबोटला ( ७) धा वांवर खलिलने माघारी पाठवले. निकोलस एकटाच संघर्ष करताना दिसला. पण, १८व्या षटकात त्याची झुंज संपली. शार्दूलच्या फुलटॉसवर निकोलस झेलबाद झाला. निकोलसने ३४ चेंडूंत २ चौकार व ६ षटकारांसह ६२ धावा केल्या. तरीही हैदराबादने ६ चेंडू २७ धावा असा सामना चुरशीचा आणला होता. कुलदीप यादवने पहिल्याच चेंडूवर कार्तिक त्यागीचा ( ७) त्रिफळा उडवला. कुलदीपने त्या षटकात ५ धावा दिल्या. दिल्लीने हा सामना २२ धावांनी जिंकला. हैदराबादने ८ बाद १८६ धावा केल्या.