IPL 2022 Sunrisers Hyderabad vs Gujarat Titans Live Updates : गुजरात टायटन्सने बुधवारी वानखेडे स्टेडियमवर सनरायझर्स हैदराबादविरुद्ध थरारक विजयाची नोंद केली. आज राहुल तेवातिया व राशिद खान यांची आतषबाजी हिट ठरली. सनरायझर्स हैदराबादने ठेवलेल्या १९६ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना गुजरातची अवस्था १४ षटकांत ५ बाद १४० झाली होती. उम्रान मलिकने ( Umran Malik) २५ धावांत ५ विकेट्स घेत गुजरातला हादरवून टाकले होते, परंतु राहुल तेवातिया व राशिद खान ( Rahul Tewatia and Rashid Khan) यांनी अशक्यप्राय विजय मिळवून दिला. हैदराबादच्या गोलंदाजांना आलेले अपयश पाहून SRHचा गोलंदाज प्रशिक्षक व महान फिरकीपटू मुथय्या मुरलीधरन ( Muttiah Muralitharan) याचा पारा प्रचंड चढला. तो शिविगाळ करताना दिसला...
अभिषेक शर्माच्या ४२ चेंडूंत ६ चौकार व ३ षटकारांसह ६५ धावा आणि एडन मार्कराम ५६ धावांच्या ( २ चौकार व ३ षटकार) जोरावर सनरायझर्स हैदराबादने तगडे आव्हान उभे केले. शशांक सिंगने ६ चेंडूंत २५ धावांची नाबाद ( ३ षटकार व १ चौकार) खेळी करून संघाला ६ बाद १९५ धावांचा डोंगर उभा करून दिला. मोहम्मद शमीने ३९ धावांत ३ विकेट्स घेतल्या. प्रत्युत्तरात, शुबमन गिल व वृद्धीमान सहा या जोडीने ९च्या सरासरीने ६९ धावा जोडल्या. पण, उम्रान मलिकने ( Umram Malik) सामना फिरवला. त्याने गिल ( २२), हार्दिक पांड्या ( १०), सहा ( ६८), डेव्हिड मिलर ( १७) व अभिनव मनोहर ( ०) यांच्या विकेट्स घेतल्या. मलिकने २५ धावांत ५ विकेट्स घेतल्या.
५ बाद १४० धावांवरून गुजरातने अशक्यप्राय विजय मिळवला. राहुल तेवातिया व राशिद खान यांनी २४ चेंडूंत ५९ धावांची भागीदारी केली. गुजरातने ५ विकेट्सने हा सामना जिंकला. तेवातिया २१ चेंडूंत ४ चौकार व २ षटकारांसह ४० धावांवर, तर राशिद खान ११ चेंडूंत ४ चौकारांसह ३१ धावांवर नाबाद राहिले. अखेरच्या षटकात विजयासाठी २३ धावा हव्या असताना या जोडीने २५ धावा कुटल्या.