Avesh Khan KL Rahul, IPL 2022 SRH vs LSG Live Updates: शेवटच्या षटकापर्यंत रंगलेल्या सामन्यात लखनौ संघाने हैदराबादला १२ धावांनी पराभूत केले. लखनौ सुपर जायंट्स संघाने प्रथम फलंदाजी करताना कर्णधार लोकेश राहुल (६४) आणि दीपक हुडा (५१) या दोघांच्या अर्धशतकांच्या बळावर १६९ धावा केल्या. या मोठ्या आव्हानाचा पाठलाग करताना हैदराबादकडून राहुल त्रिपाठी (४४) आणि निकोलस पूरन यांनी विजयाच्या आशा पल्लवित केल्या होत्या. पण आवेश खानच्या १८व्या षटकाने सामना फिरवला आणि हैदराबादला सलग दुसरा पराभव स्वीकारावा लागला. आवेश खानने ४ षटकांत २४ धावा देत ४ बळी घेतले. ही त्याच्या कारकिर्दीतील गोलंदाजीची सर्वोत्तम कामगिरी ठरली.
१७० धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना कर्णधार केन विल्यमसन १६ धावांवर बाद झाला. अभिषेक शर्मा (१३), एडन मार्करम (१२) हे दोघेही स्वस्तात बाद झाले. राहुल त्रिपाठी आणि निकोलस पूरन या दोघांनी दमदार फलंदाजी केली. पण त्रिपाठी ३० चेंडूत ४४ धावा काढून बाद झाला. त्याने ५ चौकार आणि १ षटकार मारला. पूरनदेखील २४ चेंडूत ३ चौकार व २ षटकारांसह ३४ धावांवर माघारी परतला. त्यानंतर वॉशिंग्टन सुंदरने काही काळ झुंज दिली. पण आवेश खानने टाकलेल्या १८व्या षटकात सामना फिरला. त्याने दोन चेंडूत दोन बळी टिपत हैदराबादच्या आशांना सुरुंग लावला. त्यामुळे हैदराबादचा १२ धावांनी पराभव झाला.
तत्पूर्वी, लखनौ संघाने प्रथम फलंदाजी करताना पॉवरप्ले मध्ये तीन गडी गमावले. क्विंटन डी कॉक (१) आणि एविन लुईस (१) झटपट बाद झाले. मनिष पांडेही ११ धावांवर माघारी परतला. त्यानंतर मात्र लोकेश राहुल आणि दीपक हुडा जोडीने तडाखेबाज खेळी केल्या. दीपक हुडाने ३३ चेंडूत ३ चौकार आणि ३ षटकारांसह ५१ धावा केल्या. तर राहुलने ५० चेंडूत ६ चौकार आणि एक षटकार लगावत ६८ धावांची खेळी केली. राहुल आणि दीपक हुडा बाद झाल्यानंतर आयुष बडोनीने १२ चेंडूत ३ चौकार लगावत १९ धावा केल्या. त्यामुळे संघाची धावसंख्या १६९ पर्यंत पोहोचली. नटराजन, वॉशिंग्टन सुंदर आणि शेपर्ड या तिघांनी प्रत्येकी २-२ बळी घेतले.