Join us  

Liam Livingstone IPL 2022, SRH vs PBKS Live Updates : आयपीएल इतिहासात प्रथमच घडला असा पराक्रम; लिएम लिव्हिंगस्टोनच्या वादळी खेळीने पंजाबचा विजय 

IPL 2022, Sunrisers Hyderabad vs Punjab KingsLive Updates : पंजाब किंग्सने आयपीएल २०२२मधील अखेरच्या साखळी सामन्यात सनरायझर्स हैदराबादवर विजय मिळवला.

By ऑनलाइन लोकमत | Published: May 22, 2022 10:59 PM

Open in App

IPL 2022, Sunrisers Hyderabad vs Punjab KingsLive Updates : पंजाब किंग्सनेआयपीएल २०२२मधील अखेरच्या साखळी सामन्यात सनरायझर्स हैदराबादवर विजय मिळवला. PBKSच्या गोलंदाजांनी सुरेख कामगिरी करताना SRHला ८ बाद १५७ धावांवर रोखले. त्यानंतर लिएम लिव्हिंगस्टोन ( Liam Livingstone), शिखर धवन ( Shikhar Dhawan), जॉनी बेअरस्टो यांनी दमदार फटकेबाजी करताना पंजाबचा विजय पक्का केला. या विजयासह पंजाबने सहाव्या क्रमांकावर स्पर्धेचा निरोप घेतला.

राहुल त्रिपाठी ( Rahul Tripathi) आणि अभिषेक शर्मा ( Abhishek sharma) यांनी दमदार फलंदाजी करताना PBKSला सडेतोड उत्तर दिले. यांची ४७ धावांची भागीदारी हरप्रीत ब्रारने ( Harpreet Brar ) संपुष्टात आणली. त्रिपाठी २० धावांवर परतला. अभिषेक ३२ चेंडूंत ५ चौकार व २ षटकारांसह ४३ धावांवर माघारी परतला. लिएम लिव्हिंगस्टोनने अफलातून झेल घेतला. हरप्रीतने ( ३-२६)  तीन मोठे धक्के दिले. पण, वॉशिंग्टन सुंदर ( २५) व रोमारीओ शेफर्ड ( २६*) यांनी अखेरच्या षटकांत चांगली फटकेबाजी केली व हैदराबादने आव्हानात्मक धावसंख्या उभी केली.  या दोघांनी २९ चेंडूंत ५८ धावांची भागीदारी केली. हैदराबादने ८ बाद १५७ धावा केल्या. नॅथन एलिसने ( Nathan Ellis) ४० धावांत ३ विकेट्स घेतल्या. 

हैदराबादच्या १५८ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना पंजाब किंग्सने चांगली सुरुवात केली. जॉनी बेअरस्टो ( २३) व शाहरुख खान ( १९) हे दोघंही आक्रमक खेळी करून माघारी परतले. PBKSचा कर्णधार मयांक अग्रवाल व शिखर धवन मैदानावर होते. ७व्या षटकात उम्रान मलिकच्या गोलंदाजीवर मयांक ( Mayank Agarwal) जखमी झाला. उम्रानने टाकलेला वेगवान चेंडू त्याच्या बरगडीवर जोरात आदळला आणि PBKSचा कर्णधार जमिनीवर आडवा झाला. बराच काळ तो मैदानावर पडून होता आणि त्याच्यावर प्राथमिक उपचार केले गेले. पेन किलर खाऊन तो खेळला, मात्र ८व्या षटकात तो झेलबाद झाला. लिएम लिव्हिंगस्टोनने षटकाराने त्याच्या खेळीची सुरुवात केली. 

सावध खेळ करणाऱ्या शिखरचा १३ व्या षटकात फजलहक फारूकीने त्रिफळा उडवला. धवन ३९ धावांत बाद झाला. त्याने आजच्या सामन्यात २ चौकार खेचून आयपीएलमध्ये ७०० चौकार खेचणाऱ्या पहिल्या फलंदाजाचा मान पटकावला. लिव्हिंगस्टोनला ६ व २६ धावांवर वॉशिंग्टन सुंदरने जीवदान दिल. जितेश शर्मा ७ चेंडूंत १९ धावांची खेळी करून माघारी परतला, प्रियाम गर्गने सीमारेषेवर सुरेख झेल घेतला. १५व्या षटकात लिव्हिंगस्टोनला आणखी एक जीवदान मिळाले. त्यानंत लिव्हिंगस्टोनने ९३ मीटर लांब मारलेला षटकार विक्रमी ठरला. आयपीएल २०२२मधील तो १००० वा षटकार ठरला आणि आतापर्यंतचे हे एका पर्वातील सर्वाधिक षटकार ठरले. यापूर्वी २०१८मध्ये ८७२ षटकार खेचले गेले होते. 

लिव्हिंगस्टोनने २२ चेंडूंत २ चौकार व ५ षटकारांसह नाबाद ४९ धावा केल्या. प्रेरक मंकडने चौकार खेचून पंजाबचा विजय पक्का केला. पंजाबने ५ विकेट्स व २९ चेंडू राखून १६० धावा केल्या. 

टॅग्स :आयपीएल २०२२पंजाब किंग्ससनरायझर्स हैदराबाद
Open in App