Mr. IPL Suresh Raina याला इंडियन प्रीमिअर लीगच्या १५ व्या पर्वासाठी झालेल्या ( IPL 2022) मेगा ऑक्शनमध्ये कोणत्याच संघाने आपल्या ताफ्यात घेतले नाही. पहिल्या फेरीत अनसोल्ड राहिल्यानंतर दुसऱ्या यादीत तरी रैनासाठी चेन्नई सुपर किंग्स ( Chennai Super Kings) बोली लावतील असे वाटले होते, परंतु तसेही झाले नाही. त्यामुळे आयपीएल २०२२ मध्ये सुरेश रैना खेळताना दिसणार नाही. आयपीएल फ्रँचायझींनी नाकारल्यानंतर भारताच्या माजी अष्टपैलू खेळाडूने BCCIकडे विनंती केली आहे आणि ती मान्य झाल्यात भारतीय क्रिकेटसाठी तो ऐतिहासिक निर्णय ठरू शकतो.
सुरेश रैना आणखी काही वर्ष क्रिकेट खेळू शकतो. आयपीएल मेगा ऑक्शनमध्ये CSK सह लखनौ फ्रँचायझीनेही रैनासाठी उत्सुकता दाखवली नाही. आता त्याने बीसीसीआयकडे विनंती करून परदेशी ट्वेंटी-२० लीग बिग बॅश लीग ( BBL) किंवा कॅरेबियन प्रीमिअर लीग ( CPL) येथे खेळण्याची परवानगी मागितली आहे. बीसीसीआयच्या नियमानुसार भारताचा अॅक्टिव्ह क्रिकेटपटू परदेशातील ट्वेंटी-२० लीगमध्ये खेळू शकत नाही. सर्व प्रकारच्या क्रिकेटमधून निवृत्ती घेतल्यानंतर भारतीय खेळाडूंना अन्य लीगमध्ये खेळता येते.
रैनाला २०२१च्या आयपीएलमध्ये साजेशी कामगिरीही करता आली नाही. रैनाने १२ सामन्यांत १६० धावाच केल्या होत्या. एकूण आयपीएलमध्ये २०५ सामन्यांत ३२.५१च्या सरासरीने ५५२८ धावा केल्या आहेत. त्यात १ शतक व ३९ अर्धशतकांचा समावेश आहे. शिवाय त्याने २५ विकेट्सही घेतल्या आहेत. रैनाने ५०६ चौकार व २०३ षटकार खेचले आहेत आणि १०८ झेलही टिपले आहेत.
भारताचा उन्मुक्त चंदने निवृत्ती जाहीर केल्यानंतर बिग बॅश लीग आणि अमेरिकेतील लीगमध्ये पदार्पण केले. त्याआधी युवराज सिंगने ग्लोबल ट्वेंटी-२० लीगमध्ये सहभाग घेतला होता. इरफान पठाण व मुनाफ पटेल यांनीही लंका प्रीमिअर लीगमध्ये सहभाग घेतला होता. प्रविण तांबे हा परदेशी लीगमध्ये खेळणारा पहिला भारतीय खेळाडू ठरला होता. त्याने कॅरेबियन प्रीमिअर लीगमध्ये सहभाग घेतला होता.