Sunil Gavaskar on Shivam Dube, IPL 2022 LSG vs CSK: चेन्नई सुपर किंग्स विरूद्धच्या सामन्यात लोकेश राहुलच्या लखनौ सुपर जायंट्सने दमदार विजय मिळवला. लखनौ संघाला शेवटच्या दोन षटकात ३४ धावांची आवश्यकता असताना चेन्नईचा एक निर्णय चुकला आणि त्याचा पुरेपूर फायदा लखनौ संघाने घेतला. १९व्या षटकात फारसा अनुभव नसलेल्या शिवम दुबेला गोलंदाजी देण्यात आली. लखनौच्या फलंदाजांनी त्याच्या षटकात २ चौकार आणि २ षटकारांसह तब्बल २५ धावा लुटल्या. त्यामुळे शेवटच्या षटकात ९ धावांची आवश्यकता असताना सामना लखनौने सहज जिंकला. CSK च्या या पराभवानंतर सुनील गावसकर यांनी शिवम दुबेला चांगलंच सुनावलं.
"शिवम दुबेने याआधी अनेक टी२० सामने खेळले आहेत. असं असूनही तो गुड लेंग्थ बॉल टाकतो हे चुकीचं आहे. तो इतके सामने खेळून सुद्धा अजूनही काहीही शिकलेला नाही. असे चेंडू नक्कीच मैदानाबाहेर जाणार याची त्याची कल्पना असायला हवी होती. ज्या गोलंदाजाने पूर्ण सामन्यात गोलंदाजी केलेली नाही, त्याला तुम्ही महत्त्वाचे १९वे षटक कसं काय देता? नवा गोलंदाज आल्यावर फलंदाज त्याच्या गोलंदाजीवर नक्कीच फटके मारणार हे तुम्हाला माहिती हवं होतं. तो गतीत बदल करत होता, पण अशा खेळपट्ट्यांवर संथ गतीच्या चेंडूंचा काहीही उपयोग होत नाही. ज्या पिचवर चेंडू बॅटवर पटकन येतोय तिथे अशा गोलंदाजीचा काय उपयोग?", असं गावसकर म्हणाले.
"CSK ला आपल्या गोलंदाजांचं गणित जमवता आलं नाही. त्यांनी असा गोलंदाज आणला जो वेगाने टाकत असला तरी चेंडू मारण्यासाठी सोपे असतील. यातूनच हे दिसतं की शिवम दुबे अजूनही काहीही शिकलेला नाही. चेंडू कितीही वेगाने टाकला तरी तो चेंडू फलंदाजाच्या पट्ट्यात दिला की फलंदाज फटकेबाजी करणारच. पहिल्या चेंडूवर षटकार, त्यानंतर चौकार, त्यापाठोपाठ दुसरा चौकार आणि शेवटच्या चेंडूवर षटकार अशी त्याच्या ओव्हरमध्ये २५ धावा कुटल्या गेल्या. शिवम दुबेने यातून शिकायलाच हवं", असंही गावसकर म्हणाले.