IPL 2022 T20 Match CSK vs KKR Live Updates : चेन्नई सुपर किंग्सने आघाडीचे तीनही फलंदाज गमावले आहेत. ऋतुराज गायकवाड ( ०), पदार्पणवीर डेव्हॉन कॉनवे ( ३) यांना उमेश यादवने माघारी पाठवल्यानंतर रॉबीन उथप्पाने डाव सावरला होता. पण, वरुण चक्रवर्तीच्या गोलंदाजीवर यष्टिरक्षक शेल्डन जॅक्सनने चपळाईने स्टम्पिंग करून CSKला मोठा धक्का दिला. उथप्पा २८ धावांवर बाद झाला. पण, या सामन्यात सहाव्या षटकात चक्रवर्थीने टाकलेला चेंडू अंबाती रायुडूची बॅट चुकवून यष्टींवर आदळला, परंतु बेल्स न पडल्याने तो नाबाद राहिला. चेंडू सीमापार गेला.
कोलकाता नाईट रायडर्स ( Kolkata Knight Riders) संघाचा कर्णधार श्रेयस अय्यर ( Shreyas Iyer) याने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. गतविजेता चेन्नई सुपर किंग्स ( Chennai Super Kings) यंदा रवींद्र जडेजाच्या नेतृत्वाखाली खेळत आहे. सॅम बिलिंग, श्रेयस अय्यर आणि अजिंक्य रहाणे यांनी आज KKR कडून पदार्पण केले आहे. कोलकाता आजच्या सामन्यात आंद्रे रसेल, सॅम बिलिंग व सुनील नरीन या तीनच परदेशी खेळाडूंसह मैदानावर उतरली आहे. चेन्नईने ड्वेन ब्राव्हो, डेव्हॉन कॉनवे, मिचेल सँटनर व अॅडम मिल्ने या चार परदेशी खेळाडूंना खेळवले आहे.
आयपीएलमध्ये सर्वाधिक २०० सामने खेळल्यानंतर कर्णधार बनलेला रवींद्र जडेजा हा पहिलाच खेळाडू ठरला. यापूर्वी मनिष पांडेने १५३ सामने खेळल्यानंतर कर्णधारपद भूषविले होते. किरॉन पोलार्डलाही कर्णधार बनण्यासाठी १३७, आर अश्विनला १११, संजू सॅमसनला १०७ व भुवनेश्वर कुमारला १०३ सामने खेळावे लागले. पण, चेन्नई सुपर किंग्सला पहिल्याच षटकात धक्का बसला. उमेश यादवने तिसऱ्या चेंडूवर ऋतुराज गायकवाडला ( ०) बाद केले. नितीश राणाने पहिल्या स्लीपमध्ये सुरेख झेल टिपला. उमेशने पाचव्यांदा आयपीएलमध्ये पहिल्याच षटकात विकेट घेतली.
ऋतुराज सलग तिसऱ्या पर्वात पहिल्याच सामन्यात भोपळ्यावर बाद झालाय, पण त्यानंतर त्याची बॅट चांगली तळपलीय. २०२०मध्ये त्याने अखेरच्या सामन्यांत ६५,७२ व ६२ अशा धावा केल्या होत्या, आयपीएल २०२१मध्ये तो ऑरेंज कॅप विनर ठरला होता. उमेशने पाचव्या षटकात CSK ला आणखी एक धक्का दिला डेव्हॉन कॉनवे ( ३) अय्यरच्या हाती झेलबाद झाला.