IPL 2022 T20 Match CSK vs LSG Live : चेन्नई सुपर किंग्सच्या ( CSK) आव्हानाला लखनौ सुपर जायंट्सने ( LSG) सडेतोड उत्तर दिले. चेन्नईच्या २१० धावांच्या प्रत्युत्तरात लखनौचा कर्णधार लोकेश राहुल व क्विंटन डी कॉक ही सलामीची जोडी ९९ धावांची भागीदारी करून उभी राहिली. त्यानंतर एव्हिन लुईसने दमदार फटकेबाजी केली. ड्वेन ब्राव्होने आजच्या सामन्यात दीपक हुडाची विकेट घेत ऐतिहासिक विक्रमाला गवसणी घातली. दक्षिण आफ्रिकेच्या ड्वेन प्रेटोरियसनेही उत्तम गोलंदाजी केली, परंतु CSKचा पराभव तो टाळू शकला नाही. शिवम दुबेला १९वे षटक देणे CSKला महागात पडले आणि लुईसने लखनौला सहज विजय मिळवून दिला.
चेन्नई सुपर किंग्सच्या फलंदाजांनी आज मनमुराद फटकेबाजी केली. नाणेफेकीचा कौल विरोधात गेल्याचे दडपण न घेता त्यांनी
लखनौ सुपर जायंट्सच्या गोलंदाजांना बदडवून काढले. रॉबिन उथप्पाने पहिल्या दोन चेंडूंवर खणखणीत चौकार खेचून इरादे स्पष्ट केले. त्यानंतर मोईन अली, अंबाती रायुडू आणि शिवम दुबे यांनी हात साफ केले. महेंद्रसिंग धोनीही ( MS Dhoni) मागे राहिला नाही. मैदानावर येताच त्याने आवेश खानचा चेंडू षटकार खेचला, त्यानंतर चौकार मारला... धोनीचा ही फटकेबाजी पाहून प्रेक्षकही नाचू लागले. धोनीने या सामन्यात ६ चेंडूंत नाबाद १६ धावा केल्या.
ऋतुराज गायकवाड ( १) लगेच धावबाद होऊन माघारी परतला तरी उथप्पा व मोईन अलीने चांगली फटेकाबी केली. दोघांनी चेन्नईला पहिल्या पॉवर प्लेमध्ये १ बाद ७३ धावा उभारून दिल्या. उथप्पा २७ चेंडूंत ८ चौकार व १ खणखणीत षटकार खेचून ५० धावांवर LBW झाला. मोईन अली २२ चेंडूंत ३५ धावांवर बाद झाला. अंबाती रायुडू व शिवम दुबेचा यांनी ६० धावांची भागीदारी केली. रायुडू २७ आणि दुबे ४९ धावांवर बाद झाला. जडेजाने ९ चेंडूंत १७ धावा केल्या. चेन्नईने ७ बाद २१० धावा केल्या. आवेश खान, रवी बिश्नोई व अँड्य्रू टाय यांनी प्रत्येकी दोन विकेट्स घेतल्या.
प्रत्युत्तरात लोकेश राहुल व क्विंटन डी कॉक यांनीही आक्रमक फटकेबाजी केली. क्विंटन १९ चेंडूंत ३० धावांवर असताना ड्वेन ब्राव्होच्या गोलंदाजीवर मोईन अलीने सोपा झेल सोडला. ३४ धावांवर लोकेश राहुलचा झेल तुषार देशपांडेने सोडला. CSKला या दोन चूका महागात पडल्या. क्विंटनने ३४ चेंडूंत अर्धशतक पूर्ण केले. ड्वेन ब्राव्हो सोडला तर चेन्नईच्या अन्य गोलंदाजांनी लोकेश-क्विंटन जोडीने धुलाई केली. ११व्या षटकात ड्वेन प्रेटोरियस गोलंदाजीला आला आणि त्याने पहिल्याच षटकात लखनौला धक्का दिला. २६ चेंडूंत ४० धावा करणाऱ्या लोकेशचा अंबाती रायुडूने सुरेख झेल टिपला. लोकेश-क्विंटनची भागीदारी ९९ धावांवर तुटली. पुढच्या षटकात तुषार देशपांडेने चेन्नईला आणखी एक यश मिळवून दिले. मनीष पांडे ५ धावांवर ब्राव्होच्या हाती झेल देऊन परतला.
लखनौच्या धावांचा वेग मंदावला, परंतु ते अजूनही विजयाच्या शर्यतीत होते. क्विंटन व एव्हीन लुईस यांनी तुषारने टाकलेल्या १४व्या षटकात १५ धावा काढून दडपण कमी केले. लखनौला ३६ चेंडूंत ७४ धावांची गजर असताना प्रेटोरियसने मोठी विकेट मिळवली. क्विंटन ४५ चेंडूंत ९ चौकारांच्या मदतीने ६१ धावांवर मोठा फटका मारण्याच्या प्रयत्नात महेंद्रसिंग धोनीच्या हाती झेल देऊन बसला. लुईस खेळपट्टीवर असल्याने लखनौच्या विजयाच्या आशा कायम होत्या. दुसऱ्या बाजूने दीपक हुडाने CSKच्या ब्राव्होलाच टार्गेट केले. १८व्या षटकाच्या पहिल्या चेंडूवर त्याने खणखणीत षटकार खेचला, परंतु ब्राव्होने पुढच्याच चेंडूवर त्याला झेलबाद केले. आयपीएलमधील त्याची ही १७१वी विकेट ठरली आणि आयपीएल इतिहासात सर्वाधिक विकेट नावावर असलेल्या लसिथ मलिंगाचा विक्रम त्याने मोडला. ( Dwayne Bravo is now the leading wicket taker of IPL history.)
१९व्या षटकात शिवम दुबेला गोलंदाजीला आणले परंतु आयुष बदोनीने त्याचा पहिलाच चेंडू षटकार खेचला. लुईसने याच षटकाच्या अखेरच्या चार चेंडूंवर २,४,४,६ अशी आतषबाजी केली आणि २३ चेंडूंत अर्धशतक पूर्ण केले. दुबेच्या त्या षटकात २५ धावा मिळाल्याने लखनौला ६ चेंडूंत ९ धावा करायच्या होत्या. बदोनीने ९ चेंडूंत १९ धावा चोपल्या. लुईस ६ चौकार व ३ षटकारांसह ५५ धावांवर नाबाद राहिला. लखनौने ६ विकेट्सने हा सामना जिंकला.
Web Title: IPL 2022 T20 Match CSK vs LSG Live Score card Updates : Dwayne Bravo is now the leading wicket taker of IPL history, Lucknow Supergiants have defeated CSK by 6 wickets
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.