IPL 2022 T20 Match LSG vs GT Live : इंडियन प्रीमिअर लीगच्या १५व्या पर्वात नव्याने दाखल झालेले गुजरात टायटन्स ( Gujarat Titans) आणि लखनौ सुपर जायंट्स ( Lucknow Super Giants ) यांच्यात एकतर्फा लढत झालेली पाहायला मिळतेय. आयूष बदोनी व दीपक हुडा यांनी संयमी खेळ कताना लखनौला १० षटकांत ४ बाद ४७ धावांपर्यंत पोहोचवले. या सामन्यात दोन कट्टर वैरी एकाच संघातून खेळताना दिसत आहेत, एकेकाळी कृणाल पांड्याने ( Krunal Pandya) ज्याला करियर संपवण्याची धमकी दिली होती, त्या खेळाडूसाठी त्याला टाळ्या वाजवाव्या लागत आहेत.
गुजरातचा कर्णधार हार्दिक पांड्याने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. मोहम्मद शमीने पहिल्याच चेंडूवर लखनौ सुपर जायंट्सना मोठा धक्का दिला. त्याने कर्णधार लोकेश राहुलची विकेट घेतली. शमीने टाकलेला अप्रतिम चेंडू लोकेशच्या बॅटची किनार घेत यष्टिरक्षक मॅथ्यू वेडच्या हाती विसावला. मैदानावरील अम्पायरने नॉट आऊट निर्णय दिल्यावर कर्णधार हार्दिकने त्वरित DRS घेतला आणि तो यशस्वी ठरला. २०१६नंतर लोकेश प्रथमच गोल्डन डक म्हणजे पहिल्याच चेंडूवर बाद झाला. २०१६मध्ये गुजरात लायन्स संघाच्या धवल कुलकर्णीनं त्याला पहिल्याच चेंडूवर बाद केले होते.
त्यानंतर क्विंटन डी कॉक ( ७) याचाही शमीने त्रिफळा उडवला. एक वर्षानंतर आयपीएलमध्ये पुनरागमन करणाऱ्या वरूण आरोनने लखनौला तिसरा धक्का दिला. एव्हिन लुईसला ( १०) त्याने बाऊन्सवर फटका मारण्यास भाग पाडले आणि शुबमन गिलने विरुद्ध दिशेने धाव घेत अफलातून झेल टिपला. लखनौचे ३ फलंदाज २० धावांवर माघारी परतले. मनीष पांडे व दीपक हुडा ही जोडी लखनौला सांभाळेल असे वाटत असताना शमीने आणखी एक धक्का दिला. मनीष ६ धावांवर त्रिफळाचीत झाला.
११व्या षटकात हार्दिक पांड्याने टाकलेल्या पहिल्याच चेंडूवर दीपक हुडाने ( Deepak Hooda) दमदार चौकार खेचला अन् डग आऊटमध्ये बसलेल्या कृणालला त्याच्यासाठी टाळ्या वाजवाव्या लागल्या. त्याच हुडाने ३६ चेंडूंत अर्धशतक झळकावले.