Dinesh Karthik MS Dhoni, IPL 2022 RCB vs KKR: कोलकाता विरूद्ध झालेल्या अटीतटीच्या लढतीत शेवटच्या षटकात बंगळुरू संघाने बाजी मारली. ६ चेंडूत ७ धावांची गरज असताना दिनेश कार्तिकने पहिल्याच चेंडूवर षटकार खेचत दबाव हलका केला आणि त्यानंतर दुसऱ्या चेंडूवर सामना जिंकवला. दिनेश कार्तिकच्या या खेळीचं कौतुक करताना बंगळुरूचा कर्णधार फाफ डु प्लेसिस ( Faf Du Plessis ) ने दिनेश कार्तिकची तुला धोनीशी केली.
"संघावर दडपण असताना जिंकलो ही गोष्ट चांगली आहे. छोट्या धावसंख्येचा पाठलाग करताना सकारात्मक दृष्टिकोन बाळगायला हवा होता. तसं झालं असतं तर सामना शेवटपर्यंत गेला नसता, पण त्यांच्या गोलंदाजांनी उत्तम कामगिरी केली. अखेर दिनेश कार्तिकचा अनुभव कामी आला. शेवटच्या ५ षटकांमध्ये महेंद्रसिंग धोनीसारखाच डीकेदेखील 'कूल' असतो", अशा शब्दात त्याने कार्तिकचं कौतुक केलं.
"या खेळपट्टीवर चेंडू टप्पा पडून बराच होत होता. दोन-तीन दिवसांपूर्वी इथे तब्बल २०० विरुद्ध २०० असा सामना रंगला होता. पण आज मात्र इथे १२० विरुद्ध १२० असा सामना रंगला. या सामन्यात आम्ही खूप आधीच जिंकायला हवं होतं, पण असो. कसही जिंकलो असलो तरीही तो आमचा विजयच आहे", असं डू प्लेसिस म्हणाला.
दरम्यान, प्रथम फलंदाजी करताना कोलकाताच्या संघाने १२८ धावा केल्या. सर्वाधिक २५ धावा आंद्रे रसेलने केल्या. तर हसरंगाने २० धावांत ४ बळी टिपले. विजयासाठी १२९ धावांचा पाठलाग करणाऱ्या बंगळुरूने विचित्र खेळी केली. त्यामुळे शेवटच्या षटकात RCBला ७ धावांची गरज होती. त्यावेळी कार्तिकने पहिल्या दोन चेंडूत षटकार आणि चौकार मारत संघाला विजय मिळवून दिला.