मुंबई : ढोपराच्या जखमेमुळे २०२२चे आयपीएल सत्र खेळणार नाही, असे सांगूनही मुंबई इंडियन्सने इंग्लंडचा वेगवान गोलंदाज जोफ्रा आर्चर याला आठ कोटी रुपयात संघात घेतले. २०२३ आणि २०२४ चे पर्व लक्षात घेत जोफ्राला लिलावात सहभागी होण्यास परवानगी देण्यात आली होती.
मुंबई संघाच्या इन्स्टाग्राम हॅन्डलवरील व्हिडिओत आर्चर म्हणाला, ‘मुंबई इंडियन्स संघाशी जुळल्याने फार आनंदी आहे. हा संघ माझ्या हृदयाजवळ आहे. आयपीएलमध्ये खेळणे सुरू केल्यापासून मी नेहमी या संघाकडून खेळण्याची इच्छा बाळगली होती. शानदार संघाकडून खेळण्याची संधी मिळाली. जगातील स्टार खेळाडूंसोबत खेळणार असून, कारकिर्दीत हा नवा अध्याय असल्याचे मानतो.’मुंबईने फिट नसलेल्या जोफ्रावर दुसऱ्या दिवशी बोली लावल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या. यावर संघाचे मालक आकाश अंबानी यांनी उत्तर दिले.
आकाश म्हणाले, ‘आर्चर यंदा खेळणार नाही, मात्र फिट असेल तर तो जसप्रीत बुमराहसोबत वेगवान मारा करण्यास उपयुक्त ठरेल.’ मुंबईचे क्रिकेट संचालक आणि भारताचा माजी वेगवान गोलंदाज जहीर खान म्हणाले, ‘बुमराह - आर्चर यांना सोबत गोलंदाजी करताचा पाहणे रोमहर्षक ठरणार आहे. सर्वांसारखी मलादेखील प्रतीक्षा आहे. दोन उत्कृष्ट गोलंदाज एकाचवेळी एकाच संघासाठी मारा करताना दिसतील.’
दूरदृष्टी ठेवून आर्चरला संघात घेतले -नीता अंबानीआयपीएल २०२२ मध्ये इंग्लंडचा वेगवान गोलंदाज जोफ्रा आर्चर उपलब्ध नसताना त्याला मुंबई संघात आठ कोटी रुपयांत स्थान मिळताच अनेकांना आश्चर्य वाटले. लिलावानंतर संघाच्या मालकीण नीता अंबानी यांनी यामागील हेतू स्पष्ट केला. मुंबई इंडियन्सचे लक्ष्य नेहमी लघुकालीन असते. मात्र, दूरदृष्टी ठेवूनच आम्ही वाटचाल करतो, असे नीता म्हणाल्या. ‘आम्ही जे खेळाडू निवडले ते दीर्घकालीन योजना आखूनच. लिलावात आम्ही सर्वाेत्कृष्ट प्रयत्न केले हे चाहत्यांना सांगू इच्छिते. नव्या पर्वाबाबत मी फारच उत्सुक आहे. मात्र, मोठा लिलाव फारच किचकट ठरतो. पाच वेळा चॅम्पियन राहिलेल्या संघातून खेळाडूंना इतर संघात जाताना पाहणे निराशादायी असते. आम्हाला त्या सर्वांची उणीव जाणवेल. हार्दिक, कृणाल, डिकॉक आणि बोल्ट या सर्वांना पुन्हा खरेदी करण्याचे सर्वश्रेष्ठ प्रयत्न केले. मात्र, लिलावात काय घडेल याचा वेध घेणे फार कठीण असते. अखेर जे पदरी पडले त्यात आम्ही समाधानी आहोत,’ असे नीता यांनी म्हटले आहे.