भारतात सध्या IPL ची धामधूम सुरू आहे. १० संघांच्या स्पर्धेमुळे जास्तीत जास्त खेळाडूंना संघात खेळण्याची संधी मिळत आहे. काही नवे चेहरे या स्पर्धेच्या माध्यमातून क्रिकेट चाहत्यांसमोर प्रसिद्ध होत आहेत. तर काही अनुभवी चेहरे स्पर्धेत नव्याने वाहवा मिळवत आहे. पंजाबचा युवा डावखुरा वेगवान गोलंदाज अर्शदीप सिंग (Arshdeep Singh) हा IPL मधील गेल्या तीन हंगामातील सातत्यपूर्ण कामगिरी करणारा खेळाडू आहे. त्याच्याबद्दल बोलताना, तो लवकरच भारताच्या टी२० संघात स्थान मिळवू शकेल, असा विश्वास भारताचे माजी प्रशिक्षक रवी शास्त्री यांनी व्यक्त केले आहे.
अर्शदीप सिंगने IPL 2019 मध्ये पदार्पण केले आणि गेल्या अनेक हंगामांपासून तो पंजाब किंग्सचा (PBKS) महत्त्वाचा घटक आहे. लिलावापूर्वी पंजाबच्या ज्या दोन खेळाडूंना फ्रँचायझीने कायम ठेवले होते, त्यात अर्शदीप सिंगचाही समावेश होता. २३ वर्षीय वेगवान गोलंदाजाने सुरूवातीच्या षटकांमधील आपली कामगिरी तर सुधारलीच, पण त्यासोबतच तो या हंगामात 'डेथ ओव्हर्स'मध्ये चमकदार गोलंदाजीही करताना दिसत आहे.
अर्शदीप सिंगबाबत रवी शास्त्रींनी विश्वास व्यक्त करताना म्हटले, "एक युवा गोलंदाज दबावाच्या परिस्थितीतही चांगली कामगिरी करत आहे. त्याच्या वयातील खेळाडूकडून अशा प्रकारची कामगिरी पाहणे सुखद आणि आश्चर्यकारक आहे. दबावातही अर्शदीप शांत राहतो आणि डेथ ओव्हर्समध्ये चांगली कामगिरी करून दाखवतो." अर्शदीप सिंग हा एक उत्तम गोलंदाज आहे, हे त्याने वेळोवेळी सिद्ध केलं आहे. महेंद्रसिंग धोनीसारख्या फलंदाजाच्या समोर १८व्या षटकात त्याने केवळ ८ धावा देत संघाला सामना जिंकवून देण्यात मोठी भूमिका बजावली होती.