Mitchell Marsh, IPL 2022: सर्व क्रिकेटप्रेमींसाठी एक दिलासा देणारी बातमी अखेर समोर आली. IPL रद्द होणार की नाही याची चर्चा काही काळापासून सुरू होती. Delhi Capitals चा खेळाडू मिचेल मार्शची अँटिजेन टेस्ट पॉझिटिव्ह आली असल्याने संघाला क्वारंटाइन करण्यात आले होते. पण मार्शचा RT-PCR रिपोर्ट निगेटिव्ह आल्याने IPL रद्द होणार नसून सामने ठरल्याप्रमाणेच होतील, यावर शिक्कामोर्तब झाले आहे.
ऑस्ट्रेलियाचा अष्टपैलू खेळाडू आणि दिल्ली कॅपिटल्सचा वरच्या फळीतील स्टार फलंदाज मिचेल मार्श याची बंधनकारक असलेली RT-PCR कोविड टेस्ट सोमवारी निगेटिव्ह आली. दिल्लीचे फिजिओ पॅट्रिक फरहार्ट यांना कोरोनाची लागण झाल्यानंतर दिल्लीच्या संघाने सर्व खेळाडू आणि सदस्यांची कोविड रॅपिड अँटिजेन टेस्ट केली होती. त्यात मिचेल मार्शची टेस्ट पॉझिटिव्ह आल्याने दिल्ली कॅपिटल्सच्या गोटात काही काळासाठी भीतीचे वातावरण होते. दिल्ली संघ व्यवस्थापनाने सर्वांना हॉटेलमध्ये क्वारंटाइन करत त्यांची बंधनकारक असलेली RT-PCR टेस्ट करण्यात आली. त्यात अँटिजेन टेस्ट पॉझिटिव्ह आलेल्या मिचेल मार्शची कोविड टेस्टही निगेटिव्ह आली. याचाच अर्थ आता दिल्लीच्या संघाचा पंजाब किंग्जशी बुधवारी (२० एप्रिल) होणारा सामना नियोजित वेळापत्रकाप्रमाणेच होईल, हे जवळपास स्पष्ट झाले आहे.