इंडियन प्रीमिअर लीग २०२२ मध्ये गुजरात टायटन्स व लखनौ सुपर जायंट्स या दोन नव्या संघांनी एन्ट्री मारली. गुजरातने हार्दिक पांड्याकडे कर्णधारपदाची जबाबदारी सोपवली अन् शुबमन गिल व राशिद खान यांना आयपीएल ऑक्शनपूर्वी करारबद्ध केले. हार्दिकच्या नेतृत्वाखाली Gujarat Titans ने फायनलमध्ये राजस्थान रॉयल्सवर विजय मिळवून जेतेपद पटकावले. पहिल्याच प्रयत्नात जेतेपद पटकावणारा राजस्थान रॉयल्सनंतर तो दुसरा संघ ठरला. आता हार्दिकचा संघ आयपीएल २०२३मध्ये जेतेपद कायम राखून चेन्नई सुपर किंग्स व मुंबई इंडियन्स यांच्या विक्रमाशी बरोबरी करण्याच्या तयारीत आहे. अशात शनिवारी गुजरात टायटन्सच्या एका ट्विटने सोशल मीडियावर हंगामा केला.
कोलकाता नाइट रायडर्सने रिलीज केल्यानंतर भारताचा युवा फलंदाज शुबमन गिल हा कोणत्या संघात जाणार याची सर्वांनाच उत्सुकता होती. गुजरातने गिलवर विश्वास दाखवला आणि त्याला आपल्या ताफ्यात घेतले. गिलनेही IPL 2022 मध्ये १६ सामन्यांत ४ अर्धशतकांसह ४८३ धावा केल्या. पण, तरिही गुजरात टायटन्सच्या ट्विटने खळबळ माजवली. शुबमन गिलला आयपीएल २०२३आधी रिलीज करणार असल्याची चर्चा सुरू झाली आहे आणि फलंदाजानेही त्यावर रिप्लाय दिला आहे.
१० संघामुळे BCCI ने आयपीएल २०२३चा कालावधी दोन महिन्यांवरून अडीच महिने करण्याचा निर्णय घेतलाय आणि ICC नेही त्यासाठी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये विंडो उपलब्ध करून दिली आहे. त्यात आता आयपीएलमध्ये नवी नियम आणण्याची तयारी बीसीसीआयने सुरू केली आहे. फुटबॉल, रग्बी, बास्केटबॉल, कबड्डी आदी खेळांमध्ये जसे राखीव खेळाडू मैदानावर खेळू शकतात तसाच हा नियम असणार आहे आणि ‘IMPACT PLAYER’ असे त्याला नाव दिले गेले आहे. CSK प्रमाणे इतर संघातही बदल दिसतील. त्याची सुरुवात गुजरात टायटन्सपासून होतेय की काय अशी चिन्हे दिसू लागली आहेत...
गुजरात टायटन्सने ट्विट केले की, ''तुझा हा प्रवास कायम लक्षात राहिल. तुला पुढच्या प्रवासासाठी शुभेच्छा शुबमन गिल... '' गिलनेही त्यावर रिप्लाय देताना लव्हची इमोजी पोस्ट केली...
काहींच्या मते हा प्रँक असल्याचीही चर्चा आहे. शुबमन गिलला रिलीज करणे टायटन्सना परवडणारे नाही. तो चांगला फलंदाज आहे.