मुंबई - आयपीएलच्या या हंगामात चांगली सुरुवात करणाऱ्या रॉयल चॅलेंजर्सची कामगिरी स्पर्धेतील मोक्याच्या क्षणी ढेपाळली आहे. त्यातच संघाचा मुख्य फलंदाज विराट कोहलीचा खराब फॉर्म कायम असल्याने आरसीबीची चिंता वाढली आहे. आतापर्यंत खेळलेल्या ९ सामन्यात विराट कोहलीला १६ च्या सरासरीने केवळ १२८ धावाच जमवता आल्या आहेत. त्यामुळे विराटवर चौफेर टीका होत असून, भारतीय संघाचे माजी प्रशिक्षक रवी शास्त्री यांनी त्याला मोलाचा सल्ला दिला आहे. विराटने काही काळासाठी ब्रेक घेतला पाहिजे आणि आयपीएलच्या सध्याच्या हंगामातून माघार घेतली पाहिजे, असे रवी शास्त्री यांनी म्हटले आहे.
विराट कोहली आयपीएलमध्ये सर्वाधिक धावा फटकावणारा फलंदाज आहे. त्याच्या नावावर ५ शतके आणि ४२ अर्धशतके आहेत. मात्र या हंगामात विराटचा फॉर्म खूपच खराब असल्याचे दिसत आहे. गेल्या हंगामानंतर विराटने कर्णधारपद सोडले होते. तसेच आता तो फाफ डू प्लेसिसच्या नेतृत्वाखाली खेळत आहे. त्यादरम्यानच गेल्या तीन-चार सामन्यात विराटची बॅट शांतच असल्याचे दिसून आले. त्यामुळे रवी शास्त्री यांनी हा सल्ला दिला आहे.
रवी शास्त्री यांनी जतीन सप्रूच्या युट्युब चॅनलवर सांगितले की, मला वाटते की, सध्याच्या परिस्थितीत ब्रेक घेणे हेच समजुतदारपणाचे ठरेल. कधी कधी योग्य संतुलन साधावे लागते, हे तुम्हाला माहितीच असेल. तुला तुझी आंतरराष्ट्रीय कारकीर्द अधिक दीर्घ करायची असेल आणि पुढची ६-७ वर्षे खेळायचं असेल तर पुढच्या ६-७ वर्षांसाठी आयपीएलमधून माघार घेऊन बाहेर गेलं पाहिजे.
शास्त्री यांनी पुढे सांगितले की, हा सल्ला केवळ विराट कोहलीसाठीच नाही तर खराब फॉर्मशी झुंजत असलेल्या इतर फलंदाजांनाही देईन. भारतीय संघासाठी खेळताना या खेळाडूंनी ब्रेक घेण्याऐवजी आताच ब्रेक घेणं, योग्य ठरेल, असं शास्त्री यांनी सांगितले.
तुम्ही १४ ते १५ वर्षांपासून खेळत आहात. विराटच नाही, तर मी कुठल्याही इतर खेळाडूलाही सांगेन की जर तुम्हाला दीर्घकाळ खेळायचं असेल आणि भारतीय संघासाठी चांगली कामगिरी करायची असेल, तर तुम्हाला ब्रेक कधी घ्यायचा हे ठरवावे लागेल, असेही रवी शास्त्री म्हणाले.