Yuzvendra Chahal : इंडियन प्रीमिअर लीगमधील यशस्वी गोलंदाजांपैकी एक असलेल्या युझवेंद्र चहलने गुरुवारी एक भयानक अनुभव सांगितला. यंदाच्या पर्वात राजस्थान रॉयल्सकडून खेळणाऱ्या चहलच्या नावावर आयपीएलमध्ये ११९ सामन्यांत १३९ विकेट्स आहेत. २०१३ ते २०२१ हा बराच मोठा काळ तो रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूकडून खेळला. पण, आयपीएलमध्ये त्याची सुरूवात ही मुंबई इंडियन्सकडून झाली होती. २०११मध्ये चहलने त्याला आपल्या ताफ्यात घेतले. त्यानेही केवळ १ सामना खेळला, परंतु २०११च्या चॅम्पियन्स लीग ट्वेंटी-२०त तो सर्व सामने खेळला.
आयपीएल २०२२मध्ये संजू सॅमसनच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या चहलने गुरुवारी आर अश्विनसह मनसोक्त गप्पा मारल्या. यावेळी त्याने मुंबई इंडियन्ससोबत असताना घडलेला एक भयानक किस्सा सर्वांना सांगितला. २०१३मध्ये मॅचनंतर बंगळुरू येथे मुंबई इंडियन्सचे काही खेळाडू भरपूर प्यायले होते आणि ते त्याला घेऊन १५व्या मजल्यावर गेले. चहलने हा भयानक किस्सा सांगण्यास सुरूवात केली.
तो म्हणाला,''हॉटेलच्या १५व्या मजल्यावरून MIच्या खेळाडूने मला सोडले असते किंवा जर त्याची माझ्या मानेवरील पकड सुटली असती तर मी सरळ खाली पडलो असतो. नशिबाने तेथे अन्य लोकं आली आणि मला वाचवले. मला चक्कर आली आणि लोकांनी मला पाणी दिले.''
कुठेही गेल्यावर माणसं किती जबाबदार असणं गरजेचं आहे हे त्याला तेव्हा जाणवलं. चहल म्हणाला की, त्याला वाटले की मी थोडक्यात वाचलो. जर मद्यधुंद खेळाडूने चूक केली असती तर तो १५ मजल्यावरून खाली पडला असता.