Sachin Tendulkar advice to Arjun IPL 2022 : महान फलंदाज सचिन तेंडुलकर याचा मुलगा अर्जुन तेंडुलकर ( Arjun Tendulkar) याचे इंडियन प्रीमिअर लीगमध्ये पदार्पण काही झाले नाही. आयपीएल २०२१मध्ये बाकावर बसवून ठेवल्यानंतर यंदातरी मुंबई इंडियन्स ( Mumbai Indians) अर्जुनला पदार्पणाची संधी देतील असे अखेरच्या साखळी सामन्यापर्यंत वाटत होते. पण, अर्जुनच्या मागून आलेल्या हृतिक शोकिन, कुमार कार्तिकेय आदी युवा खेळाडूंनी आयपीएल २०२२मध्ये MI कडून पदार्पण केले. त्यात आता अर्जुनला मुंबईच्या रणजी संघातूनही वगळले. अशात सचिनने आपल्या मुलाला मोलाचा सल्ला दिला आहे.
''हा मार्ग आव्हानात्मक आहे, हे मी नेहमीच अर्जुनला सांगतो.. तो आणखी खडतर असेल.. तुला हा खेळ आवडतो म्हणून तू तो खेळायला सुरुवात केली. असेच करत राहा, मेहनत करत राहा आणि कष्टाचं फळ मिळेल,''असा सल्ला तेंडुलकरने ‘SachInsight’या कार्यक्रमात बोलताना अर्जुनला दिला. सचिन तेंडुलकर हा मुंबई इंडियन्सचा मार्गदर्शक आहे, परंतु संघ निवडीत आपला कोणताच हस्तक्षेप नसल्याचे त्याने स्पष्ट केले. अर्जुनला ३० लाखांत मुंबई इंडियन्सने आयपीएल २०२२मध्ये करारबद्ध केले. पण, आयपीएल २०२१प्रमाणेच त्याला एकही सामना खेळण्याची संधी दिली गेली नाही.
तुला अर्जुनला यंदाच्या आयपीएलमध्ये खेळताना आवडले असते का, या प्रश्नावर तेंडुलकर म्हणाला,''हा वेगळा प्रश्न आहे. मी काय विचार करतो किंवा मला काय वाटते, हे महत्त्वाचे नाही. हे पर्व संपले आहे.''