चेन्नई सुपर किंग्सच्या डेव्हॉन कॉनवे व ऋतुराज गायकवाड यांनी आज पुन्हा एकदा दमदार खेळ करून दाखवला. चेन्नई सुपर किंग्सच्या या सलामीवीरांनी पहिल्या विकेटसाठी ११० धावांची भागीदारी केली. ऋतुराज गायकवाड आणि डेव्हॉन कॉनवे लखनौ सुपर जायंट्सच्या गोलंदाजांना झोडपून काढत होते. मात्र लखनौ सुपर जायंट्सचा फिरकी युवा गोलंदाजाने याच खेळपट्टीवर ३ विकेट्स घेत यजमान चेन्नईला धक्का दिला.
२२ वर्षीय युवा फिरकीपटू रवी बिश्नोईने चेन्नईविरुद्ध अप्रतिम गोलंदाजी केली. बिश्नोईने ४ षटकांत २८ धावा देत ३ विकेट्स पटकावल्या. बिश्नोईने ऋतुराज गायकवाड, मोईन अली आणि शिवम दुबे यांना आपल्या फिरकीच्या जाळ्यात अडकवले. तत्पूर्वी, रवी बिश्नोईनेही दिल्ली कॅपिटल्सविरुद्धच्या पहिल्या सामन्यात चांगली गोलंदाजी करत ३१ धावांत २ विकेट्स घेतल्या होत्या.
रवी बिश्नोईने लहान वयातच लेगस्पिनर म्हणून आपला ठसा उमटवला आहे. देशांतर्गत क्रिकेटमधील चांगल्या कामगिरीच्या जोरावर त्याला गेल्या वर्षी फेब्रुवारीमध्ये टी-२० आणि त्यानंतर ऑक्टोबरमध्ये वन-डे क्रिकेटमध्ये पदार्पण करण्याची संधी मिळाली. पण, १० टी-२० आणि १ वन-डे सामना खेळल्यानंतरच बिश्नोईला भारतीय संघात संधी मिळाली नाही. टी-२० मध्ये आतापर्यंत बिश्नोईने १० सामन्यात १७च्या सरासरीने १६ विकेट्स घेतल्या आहेत.
बिश्नोईने गेल्या वर्षी फेब्रुवारीमध्ये कोलकाता येथे वेस्ट इंडिजविरुद्ध टी-२० क्रिकेटमध्ये पदार्पण केले. या सामन्यात बिश्नोईने १७ धावांत २ बळी घेतले. त्याला सामनावीर म्हणून देखील गौरवण्यात आले. पण, रविंद्र जडेजा, युझवेंद्र चहल आणि कुलदीप यादवच्या पुनरागमनानंतर रवी बिश्नोईला भारतीय संघात स्थान मिळणं कठीण झाले आहे.
शिक्षक वडील अभ्यासासाठी हट्ट करायचे
रवी बिश्नोईसाठी इथपर्यंत पोहोचण्याचा प्रवास सोपा नव्हता. वडील सरकारी शिक्षक होते, त्यामुळे रवीने अभ्यासात लक्ष द्यावे अशी त्यांची इच्छा होती. पण, १० वर्षांनंतर रवीचे मन क्रिकेटमध्ये इतके गुंतले होते की, अभ्यास मागे राहिला आणि मग एक वेळ अशी आली जेव्हा रवीने आयपीएलमुळे १२वी बोर्डाची परीक्षाही सोडली.
क्रिकेटमुळे रवीने बोर्डाची परीक्षा सोडली
लखनऊ सुपर जायंट्सच्या यूट्यूब चॅनलवरील संभाषणात रवीने हा किस्सा सांगितला. रवीने सांगितले की, “मी १२वीत होतो आणि बोर्डाची परीक्षा होणार होती. त्यावेळी मी राजस्थान रॉयल्सचा नेट बॉलर होतो. एकीकडे वडील बोर्डाच्या परीक्षेच्या तयारीवर भर देत होते. दुसरीकडे, प्रशिक्षक क्रिकेटवर लक्ष केंद्रित करण्यास सांगत होते. त्यानंतर अभ्यास आणि क्रिकेटमधून खेळाची निवड केली. तेव्हा २वी बोर्डाची परीक्षाही सोडली. मात्र, एका वर्षानंतर अर्थातच मी पुन्हा बोर्डाची परीक्षा दिली आणि उत्तीर्ण झालो.”
२०२०मध्ये आयपीएलमध्ये केले पदार्पण
रवीने २०२०मध्ये आयपीएलमध्ये पदार्पण केले आणि तेव्हापासून तो ३ हंगाम खेळला आहे. रवीने आतापर्यंत ३९ आयपीएल सामन्यात ४२ विकेट घेतल्या आहेत. गेल्या मोसमातही या लेगस्पिनरने १४ सामन्यांत १३ बळी घेत लखनौ सुपर जायंट्सला प्लेऑफमध्ये नेण्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती.