आयपीएलच्या सोळाव्या हंगामामध्ये क्रिकेट प्रेमींना अनेक रोमांचक सामने पाहायला मिळत आहेत. स्पर्धेत आतापर्यंत आठ वेळा दोनशे किंवा त्यापेक्षा अधिक धावा बनल्या आहेत. मात्र कुठलाही फलंदाज आतापर्यंत शतक फटकावू शकलेला नाही. यंदाच्या हंगामातील आतापर्यंतची सर्वोच्च वैयक्तिक धावसंख्या नाबाद ९९ ही ठरली आहे. शिखर धवनने सनरायझर्स हैदराबादविरुद्ध ९९ धावांची खेळी केली. मात्र आज आम्ही आयपीएलमधील त्या रेकॉर्डबाबत बोलणार आहोत. जे एकाच सामन्यात बनले होते तसेच ते गेल्या अनेक वर्षांपासून अबाधित आहेत.
आयपीाएलमधील एका डावातील सर्वोच्च धावसंख्या, सर्वोच्च वैयक्तिक धावा, सर्वात वेगवान शतक आणि सर्वाधिक षटकार, असे हे चार विक्रम आयपीएलमधील एकाच सामन्यात बनले होते. दिवस होता २३ एप्रिल २०१३ आणि आमनेसामने होते रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आणि पुणे वॉरियर्स हे संघ. या सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने जबरदस्त कामगिरी करताना २० षटकांत ५ बाद २६३ धावा कुटल्या होत्या. या सामन्यात युनिव्हर्सल बॉस ख्रिस गेलने १७५ धावांची तुफानी खेळी केली होती.
ख्रिस गेलने तेव्हा केवळ ६६ चेंडूत १७५ धावा कुटल्या होत्या. तसेच या खेळीदरम्यान, आयपीएलमधील सर्वात वेगवान शतकाचा विक्रम आपल्या नावे केला होता. ख्रिस गेलने केवळ ३० चेंडूंमध्ये आपले शतक ठोकले होते. या १७५ धावांच्या खेळीदरम्यान, गेलने १३ चौकार आणि तब्बल १७ षटकार ठोकले होते. आयपीएलमध्ये कुठल्याही फलंदाजाने एका डावात ठोकलेले हे सर्वाधिक षटकार ठरले होते. तसेच ख्रिस गेलने या खेळीदरम्यान षटकार आणि चौकारांच्या मदतीने तब्बल १५४ धावा वसूल केल्या होत्या.
या सामन्यामध्ये आरसीबीने प्रथम फलंदाजी करताना ५ बाद २६३ धावा फटकावल्या. त्यामध्ये ख्रिस गेलच्या नाबाद १७५ धावांचा समावेश होता. बंगळुरूच्या डावात दुसरी सर्वोच्च धावसंख्या तिलकरत्ने दिलशानची ३३ धावांची खेळी ठरली होती. या डावात पुण्याच्या ईश्वर पांडे, अशोक दिंडा, मिचेल मार्श, अली मोर्तझा आणि आरोन फिंच यांनी षटकामागे १२ हून अधिकच्या सरासरीने धावा दिल्या.
या मोठ्या आव्हानाचा पाठलाग करताना पुण्याच्या संघाला २० षटकांमध्ये केवळ ९ बाद १३३ धावाच जमवता आल्या. ४१ धावांसह स्टिव्ह स्मिथ संघाचा टॉप स्कोरर ठरला होता. सामन्यात आरसीबीने १३० धावांच्या मोठ्या अंतराने विजय मिळवला होता.