IPL 2023: दोन तेंडुलकर आणि रिंकू-यश-सिराजची गोष्ट!

IPL 2023: तुमचे वडील महान खेळाडू असोत नाहीतर मजूर, तुमची गुणवत्ता-मेहनतच तुमच्यासाठी संधीची दारं उघडतात... अब राजा वो ही बनेगा जो हकदार होगा!

By ऑनलाइन लोकमत | Published: April 20, 2023 10:08 AM2023-04-20T10:08:44+5:302023-04-20T10:09:14+5:30

whatsapp join usJoin us
IPL 2023: A tale of two Tendulkars and Rinku-Yash-Siraj! | IPL 2023: दोन तेंडुलकर आणि रिंकू-यश-सिराजची गोष्ट!

IPL 2023: दोन तेंडुलकर आणि रिंकू-यश-सिराजची गोष्ट!

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

- अनन्या भारद्वाज
(क्रिकेटप्रेमी, मुक्त पत्रकार  
‘अब राजा का बेटा राजा नहीं बनेगा... अब राजा वही बनेगा जो हकदार होगा!’-सुपर थर्टी सिनेमात ऋतिक रोशनच्या तोंडी हे वाक्य आहे, तो सांगत असतो लोकशाही देशात माणसांच्या हाती असलेली गुणवत्ता, मेहनत आणि शिक्षणाची ताकद. वरकरणी हा संवाद टाळ्याखाऊ असला तरी आपल्या लोकशाही देशात राजकारणासह सर्वच क्षेत्रात आजही घराणेशाही दिसते. गुणवत्ता असो नसो; वारसा म्हणून अनेक गोष्टी सहज लाभतात. 
या साऱ्याला अपवाद ठरणारी एक गोष्ट म्हणजे क्रिकेट. वडिलांची ओळख महान क्रिकेटपटू अशी जरी असली तरी त्यांच्या मुलांना केवळ आडनावामुळे क्रिकेट क्षेत्रात यश सोडाच, अनेकदा तर संधीही लाभली नाही. आपल्या आडनावाचा ‘उपयोग’ करून क्रिकेटच्या मैदानात ‘पता है मै किस का बेटा हूं!’ अशी टिमकी त्यांना वाजवता आली नाही. 

लोकशाही तळागाळापर्यंत रुजू शकते आणि ज्याच्याकडे गुणवत्ता त्याला संधीची कवाडं उघडू शकतात, अशी आशा केवळ क्रिकेटच या देशात निर्माण करू शकते. आयपीएल पाहत रोज टीव्हीकडे डोळे लावून बसणाऱ्या अनेकांनी गेल्याच आठवड्यात रिंकू सिंगची कमाल पाहिली. रिंकूने एकाच ओव्हरमध्ये ५ षटकार आणि १ चौकार मारत अशक्य वाटणारा विजय खेचून आणला. रिंकूचे वडील घरोघरी सिलिंडर पोहचवण्याचं काम करतात, भाऊ रिक्षा चालवतो आणि हातातोंडाची गाठ कशीबशी पडणाऱ्या घरातला हा तरुण क्रिकेटचं स्वप्न पाहत आयपीएलमध्ये आपली ओळख कमावतो. हैद्राबादच्या मोहंमद सिराजचे वडीलही रिक्षा चालक होते. रिंकू सिंगने ज्याची गोलंदाजी फोडून काढली त्या यश दयालचे वडीलही एकेकाळी क्रिकेट खेळत, पण क्रिकेटपटू होण्याचं स्वप्न कक्षेच्या बाहेर होतं. त्यांच्या मुलानं ते पूर्ण केलं.

त्याच आयपीएल मौसमात क्रिकेटचा देव असलेल्या सचिन तेंडुलकरचा मुलगा अर्जुनही पदार्पण करतो. दोन वर्षे मुंबई इंडियन्स संघाने त्याला ताफ्यात तर घेतले; पण संधी मिळाली नाही. बाकड्यावरच बसावे लागले. दरम्यान, अर्जुन देशांतर्गत क्रिकेटमध्ये गोलंदाज म्हणून चांगली कामगिरी करत होता. यंदाही मुंबई इंडियन संघाची जेमतेम सुरुवात पाहता या मौसमातही त्याला संधी मिळेल की नाही, याबाबत शंकाच होती. मात्र  आयपीएल सामन्यात खेळण्याची संधी त्याला मिळाली आणि त्यानं एक बळीही घेतला.

संघात लेकाची निवड झाल्याचं कळताच सचिनने इंस्टाग्रामवर लिहिलेली एक पोस्टच पुरेशी बोलकी  आहे. क्रिकेटपटू होण्याचं स्वप्न पाहणाऱ्या कुणाही मुलाच्या वडिलांचं भावुकपण त्यात दिसतं. अखेरीस आपला मुलगा आयपीएल सामना खेळणार याचं कौतुक, आनंद तर त्यात आहेच, खेळाप्रती आदर आणि कष्टांची जाणीवही आहे.

त्या पोस्टखाली प्रतिसाद म्हणून अजून एक पोस्ट दिसते ती साक्षात महान खेळाडू सुनील गावसकरांची. ते सचिनला उद्देशून म्हणतात ‘आयुष्याची पन्नाशी गाठता गाठता तुला ही किती सुंदर भेट मिळाली आहे. वसिम-वकार-वॉल्श-मॅग्रा-मुरलीधरन यांचा सामना करताना वाटली नसेल तितकी धास्ती अर्जुन कसा खेळेल या भावनेनं तुला वाटली असेल. पण यश-अपयश आपल्या हातात नसतं, जसं तू खेळावर निरंतर प्रेम केलंस तसं त्यालाही करायला सांग. शुभेच्छा!’ 

हे दोघं ‘बाप’ माणसं काय सांगतात, त्यांच्या शब्दांतल्या भावना नेमकं काय मांडू पाहतात हे कुणाही क्रिकेटप्रेमीला सहज कळावं. या देशात लाखो मुलं क्रिकेटपटू होण्याचं स्वप्न पाहतात. क्रिकेट जगतात. एक दिवस आपल्या डोक्यावर भारतीय संघाची ‘कॅप’ असेल, असं वाटून जीवाचं रान करतात. त्यांचं स्वप्न त्यांचे पालकही जगतात; पण सोपं नसतंच क्रिकेटपटू घडवणं, घडणं. पण हे शहाणपण स्वप्नांना कसं सांगणार? 

मात्र क्रिकेटचं लोकशाही वास्तव एकच सांगतं.. तुम्ही कुणीही असा, तुमचे वडील महान खेळाडू असोत नाहीतर मजूर, तुमची गुणवत्ता-मेहनत या दोनच गोष्टी तुमच्यासाठी संधीची दारं उघडतात. आणि उत्तम खेळलात तरच तुम्ही या मैदानावर टिकता..  अब राजा वो ही बनेगा जो हकदार होगा! 

Web Title: IPL 2023: A tale of two Tendulkars and Rinku-Yash-Siraj!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.