Indian Premier League 2023 : इंडियन प्रीमिअर लीग २०२३साठी आतापासून फ्रँचायझी तयारीला लागल्या आहेत. रवींद्र जडेजा पुढील पर्वात चेन्नई सुपर किंग्सकडून खेळणार की नाही, हे नोव्हेंबर-डिसेंबर महिन्यात सुरू होणाऱ्या ट्रेडिंग विंडोनंतर स्पष्ट होईल. त्यात प्रीती झिंटाची मालकी हक्क असलेल्या पंजाब किंग्स ( Punjab Kings) च्या वर्तुळात मोठ्या घडामोडी घडताना दिसत आहेत. पंजाब किंग्सने आणखी एक सदस्याला जबाबदारीतून मुक्त करण्याचा निर्णय जवळपास घेतला आहे. पंजाब किंग्सने मागील पर्वात मयांक अग्रवाल ( Mayank Agarwal) याला कर्णधाराची जबाबदारी दिली होती, परंतु आता त्याची उचलबांगडी होणार आहे. पुढील पर्वात इंग्लंडच्या स्फोटक फलंदाजाकडे ही जबाबदारी दिली जाण्याची शक्यता आहे.
PBSK ने आधीच मुख्य प्रशिक्षक अनिल कुंबळे यांच्यासोबतचा तीन वर्षांचा प्रवास संपुष्टात आणण्याची तयारी दर्शवली आहे. InsideSportच्या वृत्तानुसार ट्रेव्हर बायलिस व इयॉन मॉर्गन यापैकी एक पंजाब किंग्सच्या मुख्य प्रशिक्षकपदाची जबाबदारी स्वीकारू शकतात. त्यात कर्णधार मयांक अग्रवालकडूनही कर्णधारपद काढून घेतले जाणार असल्याचे वृत्त समोर येत आहे.
मयांकने मागील पर्वात १३ सामन्यांत १६.३३ च्या सरासरीने १९६ धावाच केल्या. आयपीएलमधील निराशाजनक कामगिरीनंतर त्याने भारतीय संघातीलही स्थान गमावले. मयांकच्या जागी जॉनी बेअरस्टो याचे नाव कर्णधारपदाच्या शर्यतीत आघाडीवर आहे.