अखेरच्या चेंडूवर ५ धावांची गरज असताना राजस्थान संघाचा वेगवान गोलंदाज संदीप शर्माने टाकलेला नो बॉल हैदराबादसाठी जीवदान देणारा ठरला. यानंतर मिळालेल्या अतिरिक्त चेंडूवर अब्दुल समदने निर्णायक षटकार ठोकत सनरायझर्स हैदराबादला राजस्थान रॉयल्सविरुद्ध ४ गड्यांनी रोमहर्षक विजय मिळवून दिला. राजस्थानने २० षटकांत २ बाद २१४ धावा केल्यानंतर हैदराबादने २० षटकांत ६ बाद २१७ धावा केल्या.
राजस्थानविरुद्ध हैदराबादच्या सामन्यानंतर आयपीएलच्या गुणतालिकेत मोठा बदल झाला आहे. राजस्थान विरुद्ध हैदराबाद सामन्यापूर्वी राजस्थान गुणतालिकेत चौथ्या क्रमांकावर होता, मात्र या हैदराबादविरुद्धच्या पराभवानंतरही ते चौथ्या क्रमांकावर आहे. दुसरीकडे, हैदराबादमधील स्थितीत किंचित सुधारणा झाली आहे. संघ दहाव्या स्थानावर होता, पण आता नवव्या क्रमांकावर पोहोचला आहे.
रविवारी झालेल्या पहिल्या डबल हेडर सामन्यात गुजरातने लखनौचा पराभव केला आणि गुणतालिकेत पहिलं स्थान कायम राखलं आहे. लखनौच्या पराभवाचा चेन्नईला फायदा झाला आहे. चेन्नई संघ गुणतालिकेत लखनौला मागे टाकत पॉईंट्स टेबलमध्ये दुसऱ्या स्थानावर पोहोचला आहे. गुजरात आणि चेन्नईचं प्लेऑफमधील स्थान जवळजवळ निश्चित झालं आहे. असं असलं तरी सर्व संघांना प्लेऑफमध्ये पोहोचण्याची संधी आहे. त्यासाठी संघांना आगामी सामने जिंकावे लागतील.
आयपीएल गुणतालिकेत गुजरात पहिल्या स्थानावर कायम आहे. गुजरातने आतापर्यंतचा ११ सामन्यांपैकी ८ सामने जिंकले असून संघाकडे १६ गुण आहेत. चेन्नई १३ गुणांसह दुसऱ्या क्रमांकावर आहे. तर लखनौ तिसऱ्या क्रमांकावर आहे. राजस्थान चौथ्या स्थानावर असून आरसीबी १० गुणांसह पाचव्या स्थानावर आहे. मुंबई देखील १० गुणांसह सहाव्या, तर पंजाब १० गुणांसह सातव्या आणि कोलकात आठव्या क्रमांकावर आहे. हैदराबाद नवव्या क्रमांकावर असून दिल्ली ८ गुणांसह दहाव्या स्थानावर आहे.
आज कोलकाता विरुद्ध पंजाब
यंदाच्या सत्रात आतापर्यंत संमिश्र कामगिरी केलेल्या कोलकाता नाइट रायडर्स आणि पंजाब किंग्ज या संघांना प्ले ऑफच्या दिशेने भक्कम वाटचाल करण्यासाठी विजय मिळवणे आवश्यक आहे. याच उद्देशाने सोमवारी हे दोन्ही संघ एकमेकांविरुद्ध भिडतील. कोलकाताला संघ संतुलनाच्या दृष्टीने काही कठोर निर्णय घेण्याची आवश्यकता असून, पंजाबलाही खेळाच्या तिन्ही विभागांत दमदार कामगिरी करावी लागेल.