Join us  

अर्जुन तेंडुलकर आणि वडील सचिन यांच्यात 'हे' साम्य; सुनील गावसकरांनी दाखवून दिली महत्त्वाची बाब

अर्जुनच्या अप्रतिम शेवटच्या षटकामुळेच मुंबई इंडियन्सचा विजय

By ऑनलाइन लोकमत | Published: April 19, 2023 3:48 PM

Open in App

Sunil Gavaskar on Arjun Tendulkar, IPL 2023: मुंबई इंडियन्सच्या संघाने रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली हैदराबाद विरूद्धच्या सामन्यात विजय मिळवला. मुंबईने मंगळवारी विजयाची हॅटट्रिक केली. या विजयाचा हिरो ठरला कॅमेरॉन ग्रीन आणि अर्जुन तेंडुलकर. कॅमेरॉन ग्रीनने दमदार अर्धशतक ठोकले आणि दोन बळी टिपले. तर अर्जुनने अत्यंत दडपणाच्या वेळी शेवटचे षटक टाकत Mumbai Indians संघाला विजय मिळवून दिला. या सामन्यानंतर मास्टरब्लास्टर सचिन तेंडुलकर (Sachin Tendulkar) अर्जुन तेंडुलकरचे कौतुक होत आहे. तशातच आता माजी कर्णधार सुनील गावसकर यांनी अर्जुनबद्दल महत्त्वाचे विधान केले आहे.

भारताचा दिग्गज फलंदाज सुनील गावस्कर यांनी अर्जुन तेंडुलकरचे कौतुक केले असून त्याला त्याचे वडील सचिन तेंडुलकर यांच्याकडून दडपण हाताळण्याची दैवी देणगी लाभली असल्याचे म्हणाले. अर्जुनने सनरायझर्स हैदराबाद विरुद्ध मुंबई इंडियन्सचे शेवटचे षटक टाकले आणि त्याची पहिली IPL विकेट घेऊन मुंबईला 14 धावांनी विजय मिळवून दिला. गावसकर यांनी अर्जुन आणि त्याच्या महान वडिलांमधील साम्य दाखवले आणि ज्युनियर तेंडुलकरचे एक दमदार क्रिकेटर म्हणून वर्णन केले.

गावस्कर यांनी स्टार स्पोर्ट्स क्रिकेट लाइव्हवर सांगितले, "सचिन तेंडुलकरमध्ये त्याच्या कारकिर्दीच्या सुरुवातीला काय अद्भुत प्रतिभा आहे याबद्दल प्रत्येकजण बोलत होते. त्याचा स्वभावही अप्रतिम होता आणि अर्जुनलाही तोच स्वभाव मिळाला आहे. तो विचार करणारा क्रिकेटपटू असल्याचे दिसून येते. तरुण खेळाडूला शेवटचे षटक टाकायला मिळते आणि तो संघ जिंकतो हे चांगले लक्षण आहे."

हैदराबादवर 14 धावांनी विजय मिळवून मुंबईने उर्वरित संघांना एक संदेश दिला आहे की पाच वेळचे चॅम्पियन आपल्या लयीत परतले आहेत. मुंबईने सलग तीन सामने जिंकले असून या बदलाचे प्रमुख कारण म्हणजे कॅमेरॉन ग्रीन, तिलक वर्मा आणि अर्जुन या युवा खेळाडूंची कामगिरी हे असल्याचे बोलले जात आहे.

मोठ्या स्टार्सच्या अनुपस्थितीत मुंबई संघातील युवा खेळाडू आपली कामगिरी दाखवत आहेत, हे कोणत्याही संघासाठी चांगले लक्षण असल्याचे मत ऑस्ट्रेलियाचा माजी क्रिकेटपटू अॅरॉन फिंच याने व्यक्त केले. फिंचने स्टार स्पोर्ट्सला सांगितले की, 'जसप्रीत बुमराह आणि जोफ्रा आर्चरसारख्या बड्या स्टार्सच्या अनुपस्थितीत मुंबई संघाचे युवा खेळाडू पुढे आलेत. पहिल्या एक-दोन सामन्यांमध्ये या मोठ्या खेळाडूंची कमतरता संघाला होती, पण आता युवा खेळाडू ही कामगिरी करून दाखवत आहेत. भारताचा माजी क्रिकेटपटू इरफान पठाण कॅमेरॉन ग्रीनच्या प्रगतीने प्रभावित झाला. तो म्हणाला, "कॅमरॉन ग्रीन हा जागतिक क्रिकेटचा पुढचा सुपरस्टार असेल. तो एक प्रतिभावान खेळाडू आहे आणि दिवसेंदिवस त्याच्या खेळाचा स्तर उंचावत आहे."

टॅग्स :आयपीएल २०२३सुनील गावसकरअर्जुन तेंडुलकरसचिन तेंडुलकरमुंबई इंडियन्स
Open in App