IPL 2023 Auction, CSK, Josh Little: चेन्नई सुपरकिंग्स हा असा संघ आहे ज्यामध्ये जगभरातील क्रिकेटपटू स्थान मिळवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न करताना दिसतात. CSK ला खेळाडू केवळ एक संघ न मानता, एक मोठी संस्था किंवा विद्यापीठ मानतात. याच चेन्नई सुपर किंग्ज संघाविरुद्ध एका परदेशी वेगवान गोलंदाजाने मात्र मोठं विधान केलं आहे. चेन्नई सुपरकिंग्जमध्ये आपल्याला अन्यायकारक वागणूक मिळाल्याचे त्याने अप्रत्यक्षपणे सांगितले. हा खेळाडू गेल्या वर्षी चेन्नई संघासोबत एका खास उद्देशाने जोडला गेला होता, पण त्याच्यासोबत असं काही घडलं की त्याने दोन आठवड्यांनंतर संघ आणि कॅम्प सोडला.
कोण आहे तो खेळाडू, नक्की काय घडलं?
"मला सांगण्यात आले की मी नेट बॉलर आहे आणि जर एखादा खेळाडू जखमी झाला तर मला खेळण्याची संधी मिळू शकेल. पण जेव्हा मला नेट्समध्ये गोलंदाजी करायची होती, तेव्हा मला तितकी संधीच मिळाली नाही. मला नेट्समध्ये फक्त दोन षटके देण्यात आली. मी सातासमुद्रापार प्रवास करू इथे फक्त दोन षटके टाकायला आलो होतो का?" असा विचित्र अनुभव आयर्लंडचा वेगवान गोलंदाज जोशूआ लिटल याने CSKबद्दल सांगितला.
चेन्नई कॅम्पमधील अशा प्रकारची वागणूक पाहून जोशूआ लिटल निराश झाला. त्याने लगेच तिथून निघून जाण्याचा निर्णय घेतला. लिटल म्हणाला की, जेव्हा कोणी थकलं असेल तर तेव्हाच मला गोलंदाजी करण्याची परवानगी दिली जात असे. मी तेथे इतका प्रवास करून गेलो होतो, तरीही अशा प्रकारची वागणूक का मिळाली हे माहिती नाही. एक आंतरराष्ट्रीय खेळाडू असूनही माझ्यासाठी हा फारच विचित्र अनुभव होता, असेही लिटल म्हणाला.
चेन्नई आता त्याला कधी संघात घेईल असे वाटत नाही, असे लिटलला वाटते. जोशूआ लिटलचा टी२० रेकॉर्ड उत्कृष्ट आहे. या खेळाडूने ५३ टी२० सामन्यात ६२ विकेट घेतल्या आहेत. विशेषत: टी२० विश्वचषकात या खेळाडूची कामगिरी उत्कृष्ट राहिली आहे. लिटलने आतापर्यंत या स्पर्धेतील १० सामन्यांमध्ये १६ विकेट घेतल्या आणि त्याचा इकॉनॉमी रेट प्रति षटक साडे सहा इतकाच आहे.