जगातील सर्वात मोठी आणि प्रतिष्ठिक क्रिकेट लीग असलेल्या आयपीएलला शुक्रवारपासून सुरुवात होत आहे. यंदाच्या हंगामातील पहिला सामना हा गतविजेते गुजरात टायटन्स आणि चार वेळचे विजेते चेन्नई सुपरकिंग्स यांच्यामध्ये रंगणार आहे. दरम्यान, आयपीएलच्या सोळाव्या हंगामास सुरुवात होण्यास काही अवधी राहिला असतानाच मॅचफिक्सिंगबाबत आलेल्या एका बातमीमुळे खळबळ उडाली आहे.
आयपीएलवर सट्टेबाज आणि मॅचफिक्सर्सची वक्रदृष्टी आहे. आयपीएलमधून सट्टेबाज दररोज किमान ६०० कोटींचा नफा कमावण्यासाठी तयार आहेत. इनसाइड स्पोर्ट्सने दिलेल्या माहितीनुसार सट्टेबाजीच्या आंतरराष्ट्रीय टोळीशी संबंधित असलेल्या बुकींनी दुबई आणि कराची येथे बसून सट्टा खेळण्यास सुरुवात केली आहे. त्यामध्ये भारतातील मोठ्या शहरांमधूनही भरपूर पैसा लावला जात आहे. यात दिल्ली, मुंबई, अहमदाबाद, भोपाळ आणि हैदराबाद यासारख्या शहरांचा समावेश आहे. तसेच सट्टा लावण्यासाठी त्यांनी बुकींना कोडसुद्धा देण्यास सुरुवात केली आहे.
मुंबई पोलिसांच्या क्राइम ब्रँचने १८ क्रिकेट सट्टेबाजी अॅप्स आणि ६० सट्टेबाजांच्या एका नेटवर्कचा छडा लावला आहे. ही अॅप सट्टेबाजांकडून चालवण्यात येत आहेत. या अॅप्सच्या माध्यमातून आयपीएलच्या सामन्यांवर सट्टा लावण्यात येतो.
आयपीएल जेवढी लोकप्रिय आहे त्यापेक्षा खूप अधिक यावर सट्टासुद्धा लावला जात आहे. एका क्रिकेट प्रशासकाने सांगितले की, आयपीएल सट्टेबाजीचे मार्केट हे महाराष्ट्राच्या बजेटपेक्षा अधिक आहे. त्यांनी सांगितले की, आयपीएलच्या या हंगामात ६, १० आणि २० षटकांच्या प्रत्येक सेशनमध्ये प्रतिमॅच ३ हजार ५०० कोटी रुपयांचा सट्टा लावला जातो. लीगमध्ये १० संघ सहभागी होतील. एकूण ७४ सामने खेळवले जाणार आहेत. प्रत्येक संघ १४ सामने खेळेल. त्यावरून या सामन्यांवरील सट्टेबाजीमधून चालणारा व्यवसाय किती मोठा असेल याचा अंदाज येतो.