Ben Stokes MS Dhoni, IPL 2023: चेन्नई सुपर किंग्सने (CSK) यंदाचे IPL जिंकण्यासाठी आपल्या संघात एका मोठ्या खेळाडूचा समावेश केला आहे. हा खेळाडू म्हणजे बेन स्टोक्स. स्टोक्स हा एक उत्तम फलंदाज, अतिशय प्रतिभावान गोलंदाज आणि चपळ फिल्डर आहे. आपल्या ऑलराऊंड कामगिरीच्या जोरावर संपूर्ण सामना फिरवण्याची ताकद स्टोक्समध्ये आहे. स्टोक्सला चेन्नई सुपर किंग्सने 16.25 कोटी रुपयांना विकत घेतले. इंग्लंडच्या या अष्टपैलू खेळाडूकडून अपेक्षा आहे की, तो आंतरराष्ट्रीय स्तरावर ज्याप्रकारे कामगिरी करतो, तीच कामगिरी त्याने CSK साठी IPL मध्ये करावी.
सर्वात मोठा प्रश्न हा आहे की कर्णधार महेंद्रसिंग धोनी या खेळाडूचा वापर कसा करणार? तुम्हाला हे जाणून आश्चर्य वाटेल की चेन्नई सुपर किंग्जच्या कोणत्याही खेळाडूला याची माहिती नाही. या वर्षी चेन्नई संघात सामील झालेला अनुभवी फलंदाज अजिंक्य रहाणे याने हा खुलासा केला आहे. रहाणेने एचटीशी खास संवाद साधताना सांगितले की, स्टोक्सचा वापर कसा होईल याची रणनीती फक्त धोनीच्याच मनात आणि डोक्यात आहे. रहाणेने सांगितले की, धोनीने गुजरात टायटन्सविरुद्धच्या सामन्यात स्टोक्सचा कुठे आणि कसा वापर केला जाईल याची योजना तयार केली आहे पण ते आम्हाला माहिती नाही.
बेन स्टोक्स फक्त फलंदाजी करणार?
दरम्यान, असे वृत्त आहे की चेन्नई सुपर किंग्ज बेन स्टोक्सचा फक्त फलंदाज म्हणून वापर करेल. खरे तर न्यूझीलंड दौऱ्यावर स्टोक्सच्या गुडघ्याला दुखापत झाली होती. खबरदारी म्हणून हा खेळाडू आयपीएलच्या सुरुवातीच्या सामन्यांमध्ये गोलंदाजी करणार नाही. म्हणजे स्टोक्स चेन्नईचा स्पेशालिस्ट फलंदाज असेल. ही गोष्ट कितपत खरी आहे, हे IPL 2023 च्या पहिल्या सामन्यात कळेल.
धोनी स्टोक्सला काय म्हणाला?
चेन्नई सुपर किंग्जच्या एका कार्यक्रमात धोनीने सर्व नवीन खेळाडूंचे स्वागत केले आणि त्यांना संघाची जर्सी दिली. धोनीने बेन स्टोक्सला सांगितले की, तू नवीन खेळाडू नाहीस पण चेन्नईसाठी तू नवीन आहेस. स्टोक्सला आयपीएल 2023 च्या मिनी लिलावात चेन्नई सुपर किंग्जने विकत घेतले होते. टीमचे सीईओ काशी विश्वनाथन यांनी सांगितले होते की, स्टोक्सला खरेदी केल्यानंतर धोनी खूप खूश होता. वास्तविक स्टोक्ससारखा खेळाडू संघाला अधिक बळ देतो. आता स्टोक्स चेन्नई आणि धोनीच्या अपेक्षा कितपत पूर्ण करतो हे पाहावे लागेल.