आयपीएलमध्ये आज झालेल्या पहिल्या सामन्यात दिल्ली कॅपिटल्सच्या संघाला राजस्थान रॉयल्सकडून ५७ धावांनी पराभव पत्करावा लागला. यंदाच्या हंगामातील दिल्लीचा हा सलग तिसरा पराभव ठरला आहे. दरम्यान, या सामन्यात दिल्लीची फलंदाजी सुरू असताना एक अजबच चित्र पाहायला मिळाले. सामन्यातील सतराव्या षटकात डेव्हिड वॉर्नर झेलबाद होऊन माघारील परतला. मात्र तो जवळपास डग आऊटमध्ये गेला असताना कॅमेऱ्यात दिसलेल्या एका गोष्टीमुळे पंचांनी तो चेंडू नोबॉल ठरवत वॉर्नरला पुन्हा एकदा फलंदाजीची संधी दिली.
या सामन्यात राजस्थानने उभारलेल्या धावांच्या डोंगराचा पाठलाग करताना दिल्लीचे आघाडीचे दोन फलंदाज पहिल्याच षटकात माघारी परतले होते. त्यानंतर कर्णधार डेव्हिड वॉर्नरने एक बाजू लावून धरली. पण त्याला वेगाने धावा जमवता न आल्याने सामना दिल्लीच्या हातातून निसटला होता. दरम्यान, मुरुगन अश्विनने टाकलेल्या १७ व्या षटकात मैदानात मोठी नाट्यमय घटना घडली.
त्याचं झालं असं की, मुरुगन अश्विनने टाकलेल्या या षटकातील पाचव्या चेंडूवर डेव्हिड वॉर्नरने उत्तुंग फटका खेळण्याचा प्रयत्न केला. मात्र त्याचा फटका फसला आणि चेंडू थेट जाऊन यशस्वी जयस्वालच्या हातात जाऊन विसावला. वॉर्नरने परतीची वाट धरली. तर राजस्थानच्या क्षेत्ररक्षकांनी जल्लोष सुरू केला. मात्र याचदरम्यान, क्षेत्ररक्षण करताना यशस्वी जयस्वालकडून झालेली एक चूक राजस्थान रॉयल्सला नडली. गोलंदाजाने चेंडू टाकला तेव्हा यशस्वी जयस्वाल तीस यार्ड सर्कलच्या दोन यार्ड बाहेर होता. त्यामुळे क्षेत्ररक्षणाच्या नियमांचा भंग झाल्याने पंचांनी हा चेंडू नोबॉल दिला. तसेच वॉर्नरला फलंदाजीसाठी बोलावले.
मात्र त्यानंतर वॉर्नर फार काळ खेळपट्टीवर टिकू शकला नाही. तसेच तो ६५ धावा काढून चहलच्या गोलंदाजीवर पायचित झाला. त्यानंतर वॉर्नरने डीआरएस घेतला. पण यावेळी त्याला नशिबाने साथ दिली नाही.