आयपीएलमध्ये काल रात्री झालेल्या अटीतटीच्या सामन्यात राजस्थान रॉयल्सने चेन्नई सुपरकिंग्सला अवघ्या ३ धावांनी पराभूत केले. मात्र धोनीच्या संघाला रोखताना राजस्थानचा कर्णधार संजू सॅमसनकडून मोठी चूक झाली आहे. या चुकीमुळे त्याच्यावर दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे. आयपीएलच्या गव्हर्निंग कौन्सिलने त्याला १२ लाख रुपयांचा दंड ठोठावला आहे. धोनीच्या संघाला पराभूत करण्याच्या नादात संजू सॅमसनने आयपीएलमधील महत्त्वाचा नियमि मोडला. त्यामुळे त्याच्यावर ही कारवाई करण्यात आली आहे.
चेन्नई सुपरकिंग्सच्या संघाला राजस्थान रॉयल्सविरुद्ध शेवटच्या षटकात विजयासाठी २१ धावांची गरज होती. मात्र धोनीच्या संघाला विजयासाठी ३ धावा कमी पडल्या. मात्र या सामन्यात संजू सॅमसनच्या संघाला षटकांच्या संथ गतीमुळे दंडात्मक कारवाईला सामोरे जावे लागले. मैदानात रणनीती आखण्यामध्ये राजस्थानच्या संघाने एवढा वेळ घालवला की, त्यांना निर्धारित वेळेत २० षटके पूर्ण करता आली नाहीत. त्याचा फटका संजू सॅमसन याला बसला.
आयपीएलमध्ये प्रत्येक संघाला आपली १९ षटके ही ८५ मिनिटांमध्ये पूर्ण करणे अनिवार्य आहे. आयसीसीच्या नियमानुसार ८५ मिनिटांपर्यंत २० वे षटक सुरू झाले नाही तर क्षेत्ररक्षण करणाऱ्या संघाला स्लो ओव्हर रेटसाठी दोषी धरले जाते. त्यामुळे त्यांना शेवटच्या षटकामध्ये ५ ऐवजी ४ क्षेत्ररक्षकांनाचा ३० यार्ड सर्कलच्या बाहेर ठेवण्याची परवानगी दिली जाते. त्याशिवाय सामन्यातील मानधनामध्येही कपात करण्याची तरतूद करण्यात आली आहे. तसेच या चुकीची पुनरावृत्ती झाल्यास एका सामन्यासाठी बंदीही येऊ शकते.
आयपीएलमध्ये राजस्थान रॉयल्सचा कर्णधार संजू सॅमसन हा अचानक खराब फॉर्मची शिकार झाला आहे. तो सलग दोन सामन्यांमध्ये शुन्यावर बाद झाला आहे. मात्र राजस्थान रॉयल्सच्या संघाने स्पर्धेत आतापर्यंत खेळलेल्या चार सामन्यांपैकी तीन सामन्यात विजय मिळवला आहे. संजूने पहिल्या सामन्यात अर्धशतक ठोकले होते. त्यानंतर दुसऱ्या सामन्यातही त्याने आक्रमक खेळी केली होती. मात्र नंतरच्या दोन सामन्यांमध्ये त्याची बॅट थंडावलेली दिसून आली.