Setback to Punjab Kings: IPL 2023 सुरू होण्याच्या काही दिवस आधी शिखर धवनच्या नेतृत्वाखालील पंजाब किंग्जला मोठा धक्का बसला आहे. क्रिकबझच्या वृत्तानुसार, इंग्लंड आणि वेल्स क्रिकेट बोर्डाने त्यांचा यष्टीरक्षक फलंदाज जॉनी बेअरस्टोला (Jonny Bairstow) आगामी आयपीएल हंगाम खेळण्यासाठी NOC म्हणजेच ना हरकत प्रमाणपत्र दिलेले नाही. २०२२ च्या टी२० विश्वचषकापूर्वी बेअरस्टोला गोल्फ खेळताना दुखापत झाली होती, त्या घटनेपासून तो क्रिकेटच्या मैदानावर उतरला नाही. अशा परिस्थितीत आगामी अशेस मालिका आणि २०२३च्या विश्वचषकाबाबत इंग्लंडला कोणताही धोका पत्करायचा नाही. पण संघातील इतर दोन खेळाडू लियम लिव्हिंगस्टोन आणि सॅम करन हे संपूर्ण हंगामासाठी उपलब्ध असतील.
अहवालानुसार, बेअरस्टो तंदुरुस्त होण्याचा अगदी जवळ आहे. तो बऱ्याच काळापासून क्रिकेटपासून दूर आहे. त्यामुळे त्याच्या पुनरागमनासाठी आयपीएल हे एक मोठे पाऊल ठरू शकते, असे बोर्डाचे मत आहे. जॉनी बेअरस्टोच्या अनुपस्थितीत पंजाब किंग्ज नव्या सलामीवीराच्या शोधात असेल. गेल्या मोसमापर्यंत मयंक अग्रवाल संघाचा भाग होता, मात्र यंदा संघाने त्याला करारमुक्त केले.
जॉनी बेअरस्टो व्यतिरिक्त लियम लिव्हिंगस्टोनलाही आयपीएल खेळण्याबाबत शंका होती, कारण नुकत्याच झालेल्या पाकिस्तान दौऱ्यात क्षेत्ररक्षण करताना तो जखमी झाला होता, त्यामुळे त्याला त्या दौऱ्यातून बाहेर पडावे लागले होते. पण आता तो तंदुरुस्त आहे आणि पुन्हा एकदा चाहत्यांचे मनोरंजन करण्यास सज्ज आहे. त्याचवेळी, पंजाब किंग्जचा अष्टपैलू खेळाडू सॅम करन, ज्याने लिलावात 18.50 कोटी रुपये मिळवले, तो पुन्हा एकदा संपूर्ण हंगामात जगाला आपली प्रतिभा दाखवेल.