आयपीएलमधील गटसाखळी फेरी निर्णायक टप्प्यात आली असतानाच यंदाच्या हंगामात जबरदस्त कामगिरी करणाऱ्या लखनौ सुपर जायंट्स संघाला जबर धक्का बसला आहे. लखनौचा आघाडीचा वेगवान गोलंदाज जयदेव उनाडटक दुखापतीमुळे संघाबाहेर पडला आहे. त्याला ही दुखापत रविवारी नेट्समध्ये झाली. मात्र ७ जूनपासून इंग्लंडमध्ये भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात होणाऱ्या कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या अंतिम सामन्यापूर्वी तो फिट होण्याची शक्यता आहे.
रविवारी नेट्समध्ये उनाडकट पहिला चेंडू टाकण्यासाठी जात होता. त्यावेळी राऊंड द विकेट गोलंदाजीसाठी येत असताना त्याचा डावा पाय नेटमध्ये अडकला आणि तो जमिनीवर पडला. त्यानंतर तो डावा खांदा धरून असल्याचे दिसून आले. त्यानंतर त्याने एक स्लिंग लावला आणि तो आईस पॅक लावत असल्याचे दिसले.
आता दुखापत किती गंभीर आहे हे पाहण्यासाठी उनाडकट स्कॅन करण्यासाठी मुंबईला जाणार आहे. तसेच तो बीसीसीआयने नियुक्त केलेल्या तज्ज्ञांची भेट घेणार आहे. बोर्डाच्या मेडिकल स्टाफसोबत केलेल्या चर्चेनंतर उनाडकटला आयपीएलमध्ये खेळण्यास मनाई करण्यात आली आहे. आता तो बंगळुरूमधील एनसीएमध्ये तंदुरुस्तीसाठी मेहनत घेणार आहे. तसेच तो ऑस्ट्रेलियाविरुद्ध इंग्लंडमध्ये होणाऱ्या डब्ल्यटीसीच्या फायनलपर्यंत तो तंदुरुस्त होण्याची शक्यता आहे.
जयदेव उनाडकटने यंदाच्या आयपीएलमध्ये तीन सामने खेळले आहेत. त्यात त्याने ८ षटके गोलंदाजी केली आहे. मात्र त्यात ९२ धावा देऊन त्याला एकही विकेट्स मिळालेला नाही. दरम्यान, उनाडकटचा समावेश जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या अंतिम लढतीसाठी भारतीय संघात करण्यात आला आहे.