आयपीएलमध्ये काल रात्री झालेल्या पहिल्या क्वालिफायरमध्ये चेन्नई सुपरकिंग्सने गुजरात टायटन्सला पराभूत करत विक्रमी दहाव्यांदा फायनलमध्ये धडक दिली आहे. आता चेन्नईचा संघ आयपीएलमधील आपल्या पाचव्या विजेतेपदापासून केवळ एक पाऊल दूर आहे. आयपीएलचा अंतिम सामना २८ मे रोजी खेळवला जाणार आहे. गुणतालिकेत अव्वलस्थानी राहिलेल्या गुजरात टायटन्सच्या संघाकडे आता क्वालिफायर २ मध्ये विजय मिळवून अंतिम फेरी गाठण्याची संधी असेल. आज मुंबई इंडियन्स आणि लखनौ सुपरजायंट्स यांच्यात होणाऱ्या एलिमिनेटर लढतीतील विजेत्याची गाठ गुजरातशी पडणार आहे.
चेन्नई सुपरकिंग्सच्या संघाने आतापर्यंत चार वेळा आयपीएलचं विजेतेपद पटकावलं आहे. तर एकूण दहा वेळा आयपीएलच्या फायनलमध्ये धडक दिली आहे. आयपीएलमध्ये आतापर्यंत खेळलेल्या ९ फायनलपैकी ४ वेळा चेन्नईनं विजेतेपद पटकावलं आहे. तर पाचवेळा त्यांना उपविजेतेपदावर समाधान मानावं लागलं होतं.
आयपीएलच्या अंतिम सामन्यात चेन्नईला केवळ एका संघानं कडवी टक्कर दिलेली आहे. तो संघ म्हणजे मुंबई इंडियन्स. मुंबईने आयपीएलच्या फायनलमध्ये तीन वेळा चेन्नईला पराभूत केलं आहे. २०१३, २०१५ आणि २०१९ अशा तीन वेळा मुंबईनं चेन्नईचं आव्हान परतवून लावलं आहे. मुंबई इंडियन्सच्या नावेच आयपीएलमध्ये सर्वाधित ५ विजेतेपदे पटकावण्याचा विक्रम आहे.
चेन्नईचा आयपीएल फायनलमधील रेकॉर्ड १ - २००८ उपविजेतेपद२ - २०१० - विजेतेपद३ - २०११ - विजेतेपद ४ -२०१२ - उपविजेतेपद ५ -२०१३ - उपविजेतेपद ६ - २०१५ - उपविजेतेपद ७- २०१८ - विजेतेपद ८ -२०१९ - उपविजेतेपद ९ -२०२१ - विजेतेपद १० -२०२३ - ???