IPL 2023, CSK vs RCB Live Marathi : इंडियन प्रीमिअर लीग २०२३ मध्ये आज बंगळुरूच्या चिन्नास्वामी स्टेडियमवर चेन्नई सुपर किंग्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू यांच्यात सामना सुरू आहे. ऋतुराज गायकवाड आणि डेव्हॉन कॉनवे यांच्यावर दडपण बनवण्यात RCBच्या गोलंदाजांना यश आले. तिसऱ्या षटकात मोहम्मद सिराजने टाकलेला चेंडू ऋतुराजने ( ३) उत्तुंग उडवला अन् सीमारेषेवर पार्नेलने सुरेख झेल टिपला. हा सामना पाहण्यासाठी एक सेलिब्रिटी मैदानावर उपस्थित होती आणि तिच्या स्टायलिस्ट पेहेरावाने सर्वांचे लक्ष वेधले.
CSKचा अष्टपैलू रवींद्र जडेजा (Ravindra Jadeja) याची पत्नी रिवाबा जडेजा (Rivaba Jadeja) आज स्टँडमध्ये उपस्थित होती. रवींद्र आणि रिवाबा यांच्या लग्नाचा आज सातवा वाढदिवस आहे. सामन्यापूर्वी जडेजाने पत्नीसाठी रोमँटिक पोस्ट लिहिली होती. रिवाबा जामनगर उत्तर मतदारसंघातून भाजपाच्या तिकिटावर गुजरात विधानसभा निवडणूकीत विजयी झाली. रिवाबा ही एक सामाजिक कार्यकर्ती आणि उद्योजिका आहे. ती फूड बिझनेसमध्ये असून रेस्टॉरंट चालवते. रिवाबा जडेजाची कोट्यवधींची संपत्ती, दागिने आणि अनेक घरे आहेत. रिवाबाने नामांकनाच्या वेळी निवडणूक आयोगाला दिलेल्या प्रतिज्ञापत्रात त्यांची मालमत्ता, घर, कार, व्यवसाय यासह सर्व माहिती दिली आहे.
रिवाबाचा जन्म २ नोव्हेंबर १९९० रोजी गुजरातमधील राजकोट येथे झाला. तिच्या वडिलांचे नाव हरदेव सिंह सोलंकी आणि आईचे नाव प्रफुल्लबा सोलंकी आहे. निवडणूक आयोगाला दिलेल्या प्रतिज्ञापत्रात रिवाबाने जीटीयू अहमदाबादमधून बीई मेकॅनिकलचे शिक्षण घेतल्याचं सांगितलं आहे. निवडणूक आयोगाला सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रानुसार, रवींद्र जडेजा आणि रिवाबा यांच्याकडे एकूण 97.35 कोटी रुपयांची संपत्ती असून त्यापैकी 70.48 कोटी रुपये रवींद्र जडेजाच्या नावावर आहेत. जंगम मालमत्तेमध्ये रिवाबा-रवींद्र जडेजा यांची एकूण संपत्ती 64.3 कोटी रुपये आहे.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"