Ravindra Jadeja MS Dhoni, IPL 2023: क्रिकेट चाहते सध्या T20 विश्वचषक 2022 चा हंगाम एन्जॉय करत आहेत. यानंतर इंडियन प्रीमियर लीग (IPL 2023) चा थरार रंगणार आहे. IPL च्या पुढील हंगामासाठी मिनी लिलाव (Mini Auction) डिसेंबरमध्ये होणार आहे. याआधी, १० फ्रँचायझींपैकी कोणत्याही संघाला त्यांचे काही खेळाडू करारमुक्त करायचे असतील, तर त्यांची यादी सादर करावी लागणार आहे. ही यादी सादर करण्याच्या अंतिम तारखेला सुमारे १५ दिवस उरले आहेत. या आधीही अनेक संघ आपल्या काही बड्या खेळाडूंना बाहेरचा रस्ता दाखवण्याच्या तयारीत असल्याच्या बातम्या होत्या. यामध्ये दिल्ली कॅपिटल्स (DC) शार्दुल ठाकूरला आणि चेन्नई सुपर किंग्ज (CSK) रवींद्र जाडेजा करारमुक्त करणार असल्याचे सांगितले जात होते.
जाडेजा-धोनी एकत्र खेळताना दिसणार की नाही?
जर जाडेजाला CSK ने करारमुक्त केले तर महेंद्रसिंग धोनी आणि जाडेजा पुढील सीझनमध्ये चाहत्यांना एकत्र पाहता येणार नाहीत. पण या सगळ्याच्या दरम्यान चाहत्यांसाठी एक महत्त्वाची बातमी आली आहे. चेन्नई फ्रँचायझीच्या एका विश्वसनीय सूत्राने सांगितले आहे की, जाडेजाला करारमुक्त करण्यात येणार असल्याचे वृत्त चुकीचे आहे. यामध्ये काहीही तथ्य नाही. CSK फ्रँचायझी जाडेजाची हकालपट्टी करण्याचा विचारही करू शकत नाही. म्हणजेच पुढील सिझनमध्ये धोनी आणि जाडेजा पुन्हा एकत्र खेळताना दिसणार आहेत हे स्पष्ट झाले आहे.
जाडेजाला CSK चा कंटाळा आलाय का?
चेन्नई सुपर किंग्ज संघाच्या एका विश्वसनीय सूत्राने सांगितले, "CSK सध्या रवींद्र जाडेजाला सोडण्याचा विचार करत नाहीयेत. बाहेर ज्या बातम्या पसरवल्या जात आहेत, ते वृत्त निराधार आहेत. आम्ही त्याला सोडणार या वाक्याला काही अर्थच नाही. त्यामुळे या मुद्द्यावर चर्चा होऊ शकत नाही." जाडेजाला CSK चा कंटाळा आला आहे का? असा प्रश्नही विचारण्यात आला. यावर, जाडेजा याबाबत अद्यापपर्यंत आमच्याशी काहीही बोलला नसल्याचे त्यांनी सांगितले. आम्ही त्याबद्दल बोललेलो नाही. CSK संघ आणि जाडेजा दोघेही एकमेकांसाठी तितकेच महत्त्वाचे आहेत," असे संघ व्यवस्थापनाने उत्तर दिल्याचे सूत्रांच्या हवाल्याने स्पष्ट करण्यात आले.