IPL 2023, Chennai Super Kings vs Gujarat Titans Live : ऋतुराज गायकवाड ( Ruturaj Gaikwad) च्या ९२ धावांनंतर गोलंदाजीत चेन्नई सुपर किंग्ससाठी राजवर्धन हंगर्गेकर आणि इम्पॅक्ट खेळाडू तुषार देशपांडे यांनी किल्ला लढवला. पण, गतविजेत्या गुजरात टायटन्सने सांघिक खेळ करताना इंडियन प्रीमिअर लीग २०२३ च्या पहिल्या सामन्यात विजय मिळवला. शुबमन गिलच्या ( Shubman Gill) अर्धशतकाला इम्पॅक्ट खेळाडू साई सुदर्शन व विजय शंकर यांची साथ मिळाली. राशीद खानने मॅजिकल खेळी करून मॅच फिरवली.
महेंद्रसिंग धोनीने अंबाती रायुडूच्या जागी गोलंदाज तुषार देशपांडे ( Tushar Deshpande) याला इम्पॅक्ट खेळाडू म्हणून मैदानावर उतरवले. वृद्धीमान साहा व शुबमन गिल यांनी तुषारच्या पहिल्या षटकात १५ धावा चोपल्या. राजवर्धन हंगर्गेकरने त्याच्या पहिल्या षटकात साहाची ( २५) विकेट घेतली. दुखापतग्रस्त केन विलियम्सनच्या जागी गुजरातने साई सुदर्शनला इम्पॅक्ट खेळाडू म्हणून उतरवले आणि त्याने गिलसह अर्धशतकी भागीदारी केली. राजवर्धनने ही जोडी तोडताना सुदर्शनला ( २२) बाद केले.
रवींद्र जडेजाने CSK ला तिसरे यश मिळवून देताना हार्दिकचा ( ८) त्रिफळा उडवला. गुजरातला विजयासाठी ३६ चेंडूंत ५२ धावा करायच्या होत्या. १५व्या षटकात CSK ला शुबमनची विकेट मिळाली. शुबमन ३६ चेंडूंत ६ चौकार व ३ षटकारांच्या मदतीने ६३ धावांवर तुषार देशपांडेच्या गोलंदाजीवर बाद झाला. विजय शंकरने सुरेख फटका मारताना कॉनवे व बेन स्टोक्स यांच्यामधून चौकार मिळवला. गुजरातने वाईड बॉलसाठी दोन रिव्ह्यू घेतले आणि ते दोन्ही वाया गेले. हंगर्गेकरने १८व्या षटकार विजयला ( २७) बाद करून सामन्यात रंगत आणली. हंगर्गेकरने ३६ धावांत ३ विकेट्स घेतल्या.
राहुल तेवाटिया आणि राशीद खान यांच्यावर आता गुजरातची भीस्त होती. राशीदने १९व्या षटकात दीपक चहरला खणखणीत षटकार खेचला. चहरच्या त्या षटकात १५ धावा कुटल्या गेल्या आणि २० व्या षटकात गुजरातला ८ धावा करायच्या होत्या. तुषारकडे अखेरचे षटक दिले गेले. पहिला चेंडू Wide गेल्यानंतर तेवाटियाने षटकार- चौकार खेचून गुजरातचा विजय पक्का केला. गुजरातने १९.२ षटकांत ५ बाद १८२ धावा केल्या.
तत्पूर्वी, ऋतुराज गायकवाडने( Ruturaj Gaikwad) ५० चेंडूंत ४ चौकार व ९ षटकारांसह ९२ धावांची खेळी केली. मोईन अली ( २३), शिवम दुबे ( १९), महेंद्रसिंग धोनी ( १४*) आणि अंबाती रायुडू ( १२) हे चेन्नईकडून सर्वाधिक धावा करणारे फलंदाज ठरले. गुजरातच्या राशीद खान ( २-२६), मोहम्मद शमी ( २-२९) व अल्झारी जोसेफ ( २-३३) यांनी प्रत्येकी दोन विकेट्स घेत चेन्नईच्या धावांना लगाम लावला. चेन्नईने ७ बाद १७८ धावा केल्या. धोनी ७ चेंडूंत १४ धावांवर नाबाद राहिला.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"